ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी सीईओ रवी नारायण यांना ईडीने अटक केली आहे. रवी नारायण हे एनएसईच्या को-लोकेशन घोटाळय़ातील आरोपी असून, पदावर असताना त्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती. कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून तपास सुरू होता. यामध्ये रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत होता. यानंतर अखेर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केली आहे. चित्रा रामकृष्ण यांच्या ईमेलच्या तपासातून ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे.
अधिक वाचा : मनसेला सोबत घेतल्यास भाजपा-शिंदे गटाला फटका, केंद्रीय मंत्री आठवलेंचे भाकीत
रवी नारायण एप्रिल 1994 ते 31 मार्च 2013 या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर 1 एप्रिल 2013 पासून नारायण यांची राष्ट्रीय शेअर बाजार मंडळावर नॉन-एक्झक्मियुटिव्ह श्रेणीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1 जून 2017 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.