वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज जिम पार्क्स यांचे वयाच्या 92 व्या वषी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या आठवडय़ात ते आपल्या निवासस्थानी अचानक कोसळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत त्यांनी ससेक्सचे प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी सकाळी त्यांचे खासगी रुग्णालयात निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ब्रिटनच्या क्रिकेट इतिहासातील जिम पार्क्स हे जगातील अव्वल यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून गणले गेले.
पार्क्स यांचा जन्म 1930 साली झाला. 1949 साली त्यांनी आपल्या वयाच्या 18 व्या वषी इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्स क्लबकडून पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 739 प्रथमश्रेणी सामने तसेच 137 अ दर्जाचे क्रिकेट सामने खेळले. जिम पार्क्स यांनी 46 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले असून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 36 हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. त्यांनी 23 वर्षे ससेक्स क्लबचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर 1973 साली सॉमरसेट क्लबमध्ये प्रवेश केला. 47 वर्षांपर्यंत ते क्रिकेटमध्ये सक्रिय राहिले. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनाकडे मोर्चा वळवला. ससेक्स संघाचे मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होते. इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे जिम पार्क्स यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.