वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी धावपटू तसेच 1969 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या रिले संघातील सदस्य आणि कांस्यपदक विजेते केनेथ पॉवेल यांचे रविवारी बेंगळूरमध्ये वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले.
1960 च्या दशकामध्ये केनेथ पॉवेल हे भारताचे आघाडीचे धावपटू म्हणून ओळखले गेले. 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवेल यांना दर्जेदार कामगिरी करता आली नव्हती पण त्यानंतर 1970 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. 1964 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष रिले संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्या संघामध्ये पॉवेल यांचा समावेश होता. बँकॉकच्या 1970 आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष रिले संघाला कांस्यपदक मिळाले होते. या यशामध्ये पॉवेल यांचे योगदान महत्त्वाचे होते. केनेथ पॉवेल यांचा यापूर्वी अर्जुन पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता. भारतीय ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अदिले सुमारीवाला यांनी पॉवेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.