वृत्तसंस्था/ बलिया
माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी उत्तरप्रदेशच्या बलिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. अलिकडेच स्थापन ‘अधिकार सेना’ या राजकीय पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अधिकार सेना सर्वसामान्य नागरिकांचे सर्व अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे बलिया मतदारसंघाची निवड केली आहे. स्वातंत्र्ययुद्धात बलियाची मोठी भूमिका राहिली आहे. एक उत्तम समाजाच्या स्थापनेकरता प्रयत्नशीर राहणारे जयप्रकाश नारायण तसेच चंद्रशेखर यांच्या भूमीची पूर्ण प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने सेवा करू इच्छित असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले आहे.
ठाकूर यांनी यापूर्वी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यावेळी ते तुरुंगात होते. अमिताभ ठाकूर यांना 27 ऑगस्ट 2021 रोजी अटक करण्यात आली होती. मुख्तार अंसारीच्या सांगण्यावरून बलात्काराचा आरोपी खासदार अतुल रायला वाचविण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप ठाकूर यांच्यावर होता. मार्च महिन्यात त्यांना जामीन मिळाला होता.