वार्ताहर / अळणावर
धारवाड ग्रामीणचे माजी आमदार शिवानंद अंबडगट्टी यांचे गुऊवारी पहाटे धारवाड येथील राहत्या घरात हृदयघाताच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. गुऊवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अळणावर येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.
शिवानंद अंबडगट्टी हे अंबडगट्टी घराण्यातील तिसरे आमदार होते. पहिले आमदार श्रीकांत अंबडगट्टी यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांचे लहान बंधू शशिधर अंबडगट्टी हे तऊण वयात धारवाड ग्रामीणमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत विजयी झाले होते. पण त्यांचेही हृदयविकाराने आकस्मिक निधन झाल्याने पुढच्या कालावधीसाठी 1999 साली काँग्रेस पक्षाने अंबडगट्टी घराण्यास तिकीट नाकारले. त्यामुळे शिवानंद यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून मोठा विजय मिळविला होता. यात जनतेने मोठ्या इर्षेने तन मन धनाने पाठिंबा देऊन त्यांना विजयी केले होते. पुढे दुष्काळावेळी परिस्थिती व्यवस्थित हाताळता न आल्याने त्यांना 2004 च्या निवडणुकीत हार पत्करावी लागली होती.
मनमिळावू स्वभाव असल्यामुळे जनतेशी तसेच इतर राजकीय पक्षातील नेत्यांबरोबर त्यांचे घनिष्ट संबंध होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी आजी, माजी आमदार, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांसह जनसागर उपस्थित होता. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, दोन भाऊ व बहिणी असा परिवार आहे. नुकतेच निवृत्त झालेले बेळगावचे पोलीस अधिकारी राजेंद्र अंबडगट्टी यांचे ते बंधू होत.