वृत्तसंस्था /हैदराबाद
नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतर्गत गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत तेलंगणात पदयात्रा केली आहे. भारत जोडो यात्रा गुरुवारी सकाळी हैदराबाद शहराबाहेरील पाटनचेरू येथून सुरू झाली. नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल रामदास हे वयाच्या 89 व्या वर्षीही सामाजिक हितासाठी अथक कार्य करत आहेत. त्यांनी पत्नी ललिता रामदास यांच्यासोबत ‘भारत जोडो’ यात्रेच्या 57 व्या दिवशी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभाग घेतला असल्याचे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ट्विट करत सांगितले आहे.
तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष तसेच खासदार ए. रेवंत रेड्डी, लोकसभा खासदार एन. उत्तम कुमार रेड्डी तसेच पक्षाच्या अन्य नेत्यांनी राहुल गांधींसोबत पदयात्रा केली आहे. 7 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेचा तेलंगणामधील टप्पा पूर्ण होणार आहे. ही यात्रा त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे.