वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचे माजी सलामीवीर ब्रुस मरे यांचे वयाच्या 82 वर्षी निधन झाले. पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय मिळविणाऱया न्यूझीलंड कसोटी संघात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया मरे यांनी फेब्रुवारी 1968 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि न्यूझीलंतर्फे त्यांनी 13 कसोटी खेळल्या. त्यात त्यांनी 23.92 च्या सरासरीने पाच अर्धशतकांसह 598 धावा जमविल्या. 1969 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी सर्वाधिक 90 धावा जमविल्या. त्यांच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात पाकवर 127 धावांची आघाडी घेतली होती. न्यूझीलंडने तो सामना अखेर 5 गडय़ांनी जिंकत मालिकाही 1-0 फरकाने जिंकली होती. न्यूझीलंडने मिळविलेला तो पहिलाच कसोटी मालिकाविजय होता. त्यांनी 102 प्रथमश्रेणी सामन्यात 6257 धावा जमविल्या. त्यात 6 शतकांचा समावेश आहे.