ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाब काँग्रेसचे दिग्गज हिंदू नेते सुनील जाखड (Sunil Jakhad) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी त्यांना दिल्लीत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व दिले. तीन वेळा आमदार राहिलेले आणि गुरुदासपूरचे माजी लोकसभा सदस्य असलेले जाखड, त्यांच्या कुटुंबाच्या काँग्रेससोबतच्या पाच दशकांच्या सहवासाची आठवण सांगताना भावूक झाले.
भाजपमध्ये जाखड यांनी प्रवेश केल्यांनतर त्यांचं स्वागत करताना नड्डा म्हणाले की, जाखड यांना पंजाबमध्ये एक विशेष प्रतिष्ठा लाभली होती जी काँग्रेस पक्षापासून स्वतंत्र होती आणि पंजाबमध्ये राष्ट्रवादी शक्तींना बळकट करण्यात मदत केली. “भाजप पंजाबमध्ये क्रमांक एकची राष्ट्रवादी शक्ती म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे पक्ष मजबूत करण्यासाठी आणि मजबूत पंजाबसाठी राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे,” असे नड्डा म्हणाले.
यावेळी बोलताना जाखड यांनी “१९७२ पासून आतापर्यंत तीन पिढ्या काँग्रेससोबत राहिल्याने अचानक नाते तोडणे सोपे नाही. आम्ही चांगल्या आणि वाईट काळात काँग्रेससोबत होतो,” असे जाखड म्हणाले. तसेच वैयक्तिक हितासाठी राजकारण केले नाही म्हणून भाजपने त्यांचे स्वागत केले, असे जाखड म्हणाले.
दरम्यन, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (charanjit singh channi) यांच्यावर टीका करत ट्विट केल्या प्रकरणी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होत. त्यांनंतर शनिवारी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणा केली होती.
काँग्रेस सोडण्यापूर्वी सुनील जाखड यांनी पक्षाच्या नेत्यांवर मोठे आरोप केले. ते म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाला गुंडांनी घेरले आहे. राहुल गांधी निर्णय घेत नाहीत. त्यांनी मित्र आणि शत्रू ओळखला पाहिजे. जाखड यांनी अंबिका सोनी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पंजाबमधील काँग्रेसचे बहुतांश प्रभारी सोनियांचे बाहुले बनून काम करत राहिले. जाखड यांनी काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरावरही प्रश्न उपस्थित केले होते.