याचिकादार उदय वायंगणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /पेडणे
हरमलचे माजी सरपंच इनासियो उर्फ डॅनियल डिसोजा अपात्र ठरल्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षांत गोवा पंचायत राज्य कायदा अंतर्गत 10 नुसार निवडणूक लढवता येणार नाही, असा दावा याचिकादार उदय वायंगणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, माजी सरपंच इनासियो डिसोजा यांच्याकडे संपर्क साधला असता, निवाडय़ात तसा कोणताही उल्लेख नाही. आपण दिलेल्या आदेशाचे अभ्यास करून पुढील कृती करणार, असे सांगितले.
इनासिओ डिसोजा यांनी हरमल पंचायतीच्या सरपंचपदी असताना पदाचा गैरफायदा घेत आपल्या मुलाला कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट मिळवून दिले होते. याप्रकरणातील उदय वायंगणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर त्यात ते दोषी ठरले होते. राज्य निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवले होते. अपात्र ठरल्यानंतर इनासियो डिसोजा यांनी जिल्हा न्यायालयाकडे अपिल केले होते. तोही अर्ज त्यांचा फेटाळून लावल्यानंतर याचिकादार उदय वायंगणकर यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे. त्यामुळे डिसोजा यांना पुढील सहा वर्षे कोणत्याच प्रकारची निवडणूक लढवता येणार नाही, असा दावा याचिकादार उदय वायंगणकर यांनी केला.
हरमल येथील माहिती हक्क कार्यकर्ते उदय वायंगणकर यांनी यासंदर्भात गोवा राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यात हरमल पंचायतीचे तत्कालीन सरपंच इनासियो डिसोजा, वेन्सी डिसोजा, हरमल ग्रामपंचायत, कचरा व्यवस्थापन समिती व पंचायत संचालकांना प्रतिवादी केले होते. कचरा व्यवस्थापन समितीने 15 ऑक्टोबर 2018 मध्ये कचरा गोळा करणे, कचरा साठवणे व कचऱयाची विल्हेवाट लावणे यासाठी निविदा जारी केली होती.
अद्याप निकालाची प्रत मिळाली नाही : इनासियो
यासंदर्भात माजी सरपंच इनासियो डिसोजा यांच्याकडे संपर्क साधला असता, निकालाची प्रत आपल्याला मिळाली नाही. त्या निकालासंदर्भात जर आपल्याला कुठेच सहा वर्षांसाठी निवडणूक लढवू नये, असे म्हटले नाही. तरीसुद्धा आपण न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.