6 दिवसांचा दौरा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी ब्रिटनच्या 6 दिवसीय अनौपचारिक दौऱयाला प्रारंभ केला आहे. या दौऱयादरम्यान ते ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या लोकांकडून आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. तेलगू भाषा दिवसानिमित्त लंडनमध्ये तेलगू संघाद्वारे आयोजित एका समारंभात ते सोमवारी सहभागी होणार आहेत. लेखक, विद्वान अन् भाषातज्ञ गिदुगु वेंकट राम मूर्ती पंतुलु यांच्या जयंतीनिमित्त तेलगू भाषा दिन साजरा करण्यात येतो.
31 ऑगस्ट रोजी व्यंकय्या नायडू हे अनूपम मिशनकडून आयोजित एका समारंभात ब्रिटनमधील हिंदू समुदायासाठीच्या सुविधा केंद्राच्या कार्याचा शुभारंभ करणार आहेत. याचबरोबर माजी उपराष्ट्रपती 1 सप्टेंबर रोजी ओव्हरसीज प्रेंड्स ऑफ भाजपकडून आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. 3 सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत. ब्रिटन हा भारताचा एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असून दोन्ही देशांदरम्यान बहुआयामी भागीदार तसेच संबंध आहेत.
देशाचे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी समाप्त झाला होता. याचबरोबर वतःच्या कार्यकाळात नायडू यांनी राज्यसभा अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडली होती.