मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात एक यशस्वी संशोधन करण्यात आले आहे. स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) झालेल्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. संशोधकांनी अवघ्या 40 ते 60 रुपये खर्चाचे इंजेक्शन शोधून काढले असून ते या प्रकारच्या कर्करोगावर रामबाण उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. 12 सप्टेंबरला पॅरिसमध्ये झालेल्या कर्करोग संमेलनात या संशोधनाची घोषणा झाली.
स्तन किंवा ब्रेस्ट हा महिलेच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून स्तनांमधील उती दूध तयार करतात, जे अपत्यासाठी सर्वोत्तम आहार असते. त्यामुळे स्तनांचे आरोग्य जपणे हे कोणत्याही महिलेसाठी प्राधान्याचे काम असते. अनेकदा या अवयवाला कर्करोगाची लागण होते आणि तो अवयव काढून टाकावा लागतो. अशा महिला आपल्या अपत्यांना स्तनपान देऊ शकत नाहीत. मात्र, आता हा कर्करोग बरा करू शकणारे स्वस्त इंजेक्शन उपलब्ध झाल्याने जगभरातील कोटय़वधी महिलांना दिलासा मिळाला आहे. या कर्करोगावरील सध्याची उपचारपद्धती अत्यंत महागडी आणि वेळखाऊ आहे. शिवाय परिणामांची शाश्वती अत्यंत कमी प्रमाणात आहे. स्तनांच्या कर्करोगात स्तनांच्या आतील भागात मृत पेशींच्या घट्ट गाठी निर्माण होतात, त्यामुळे ते काम करू शकत नाहीत. या इंजेक्शनमुळे या गाठी फुटून प्रवाही बनतात. परिणामी कर्करोगापासून शस्त्रक्रियेशिवाय मुक्तता मिळते, असा संशोधकांचा दावा आहे. 800 रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला असून रुग्ण बरा होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. दुसऱया अवस्थेतील कर्करोगावरही हे इंजेक्शन प्रभावी आहे.