‘समर्थाघरचे श्वान’ हा शब्द प्रयोग आपल्याला परिचित आहे. गरीबाने पाळलेला कुत्रा आणि श्रीमंत व्यक्तीने पाळलेला कुत्रा यातील अंतर दर्शविणारा हा शब्दप्रयोग आहे. श्रीमंत माणसाच्या कुत्र्यांचेही लाड गरीब माणसांपेक्षा जास्त होता असा अर्थ या शब्दप्रयोगातून ध्वनीत होतो. आता या शब्दप्रयोगाबरोबर ‘समर्थाघरचे मार्जार’ असाही शब्दप्रयोग रुढ होण्याची शक्यता आहे. मार्जार याचा अर्थ मांजर असा आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’ या अधिकृत निवासस्थानी ‘लॅरी’ नावाची मांजरी होती. आता ती याच घरात नव्या पंतप्रधान लीझ ट्रस यांच्यासमवेत राहणार आहे, असे वृत्त आहे.
बोरीस जॉन्सन यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात या मांजरीचा विशेषत्वाने उल्लेख केला होता. या मांजरीचे ते किती लाड करत असत याची वृत्ते अनेकदा प्रसिद्ध झाली आहेत. आता बोरीस जॉन्सन यांना पंतप्रधानपद सोडल्यामुळे अधिकृत निवासस्थानही सोडावे लागणार आहे. त्यांच्यावर ही वेळ आली असली तरी त्यांच्या मांजरावर मात्र अशी आपत्ती कोसळलेली नाही. ती पंतप्रधानांच्याच अधिकृत निवासस्थानी नव्या पंतप्रधानांसोबत राहणार आहे. थोडक्यात एकेकाळी सूर्य मावळत नाही इतक्या मोठय़ा साम्राज्याचे अधिपती असणाऱया ब्रिटनच्या आताच्या पंतप्रधानांना घर सोडावे लागले तरी मांजरीची बडदास्त कायम आहे. अशा मांजरीला ‘समर्थाघरचे मार्जार’ असे म्हणू नये तर काय म्हणावे?
जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर 10 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये राहावयास गेले तेव्हा त्यांनी बरोबर आपला लाडका श्वान डिलियन याला घेऊन ते या निवासस्थानी गेले. प्रारंभीच्या काळात डिलियन आणि लॅरी यांच्यात संबंध चांगले नव्हते. मात्र पुढे कालांतराने त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले, अशी माहिती प्रत्यक्ष जॉन्सन यांनी निरोपाच्या भाषणात दिली. एवढे या ‘समर्थाघरच्या’ प्राण्यांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. यातूनच समर्थाघरचे श्वान हा एक खोचक शब्दप्रयोग रुढ झाला आहे.