महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सुमारे 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित : रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार
पी. के. चापगावकर /कारवार
येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावरील युद्धनौका संग्रहालयाच्या सानिध्यात आता लढाऊ विमान संग्रहालय आकार घेणार आहे. जिल्हा प्रशासन आणि भारतीय नौसेनेच्या संयुक्त विद्यमानाने आकार घेणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सुमारे 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लढाऊ विमान संग्रहालयामुळे रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार असून या प्रकल्पामुळे रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्याकडे धाव घेणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखीन निश्चितपणे भर पडणार आहे.
कारवार शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला रविंद्रनाथ टागोर समुद्र किनारा आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील निळा अरबी समुद्र, लंडन ब्रिजपासून काळी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमापर्यंत पसरलेला स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा मनाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. किनाऱ्यावरून अनुभवता येणाऱ्या सूर्यास्ताचे दृश्य अप्रतिम व विहंगम म्हणावे लागेल. अशा या समुद्र किनाऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून आयएनएस चपळ युद्धनौका संग्रहालय यापूर्वीच आकारण्यात आले आहे. युद्धनौका संग्रहालयापासून काही अंतरावर कारवार तालुक्यातील चंडीया येथील वीरपुत्र व परमवीर चक्राने गौरविलेले आणि अलीकडेच अंदमान, निकोबारमधील एका बेटाला ज्याचे नाव दिले. त्या द्वितीय लेफ्टनंट राम राघोबा राणे यांचा पुतळा यापूर्वीच साकारला आहे. आणि अशा ऐतिहासिक ठिकाणी आता ‘लढाऊ विमान तुपोलेव 142’ संग्रहालय आकार घेणार आहे. प्रकल्प पूर्णत्त्वाला गेल्यानंतर एकाच ठिकाणी वायुसेनेचे लढाऊ विमान, नौसेनेची युद्ध नौका आणि भू-सेनेचे परमवीर चक्रविजेते राणे यांचा पुतळा असा त्रिवेणी व दुर्मीळ योग मनाला भूरळ पाडणाऱ्या रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळणार आहे.
जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते संग्रहालयाची पायाभरणी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण मंत्री व जिल्हा पालकमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या हस्ते लढाऊ विमान संग्रहालयाची पायाभरणी केली. यावेळी आमदार रुपाली नाईक, विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, येथील सीबर्ड प्रकल्पातील फ्लॅग ऑफिसर अतुल आनंद उपस्थित होते. कर्नाटक सरकारने संग्रहालयाच्या उभारणीसाठी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती मंत्री पुजारी यांनी पायाभरणीप्रसंगी दिली.
वायूदलाच्या सेवेतून निवृत्त झालेले पाच पैकी एक विमान कारवारसाठी
अतुल आनंद संग्रहालयाबद्दल माहिती देताना म्हणाले, 2017 मध्ये तामिळनाडूतील अरकोण्णन येथे असलेल्या आयएनएस राजली नौदलाच्या सेवेत असलेली 5 तुपोलेव लढाऊ विमाने सेवामुक्त झाली आहेत. यापैकी एक विमान कारवारच्या रविंद्रनाथ टागोर समुद्र किनारा संग्रहालयात ठेवण्यासाठी भारतीय नौसेनेने कारवार जिल्हा प्रशासनाशी करार केला आहे. तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे लढाऊ विमान कारवारला आणणे शक्य झाले नव्हते. तथापि आता तांत्रिक त्रुटी दूर केल्या असून लढाऊ विमानाचे भाग वेगळे करून येथे आणले जातील. आणि पुन्हा ते जोडले जातील. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. लढाऊ विमानाचे सुटे भाग आणून येथे जोडण्यासाठी भारतीय नौसेनेकडून 6 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानाचे सुटे भाग चेन्नईहून कारवारला आणण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यात येणार आहे. सुटे भाग स्थलांतराच्या प्रक्रियेला चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
लढाऊ विमान संग्रहालयाची विशाखापट्टण येथे स्थापना
अतुल आनंद पुढे म्हणाले, आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टण येथे लढाऊ विमान तुपोलेव संग्रहालय यापूर्वीच उभारण्यात आले आहे. ते संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण बनून राहिले आहे. कारवार समुद्र किनाऱ्यावरील युद्धनौका आणि लढाऊ विमान संग्रहालयामुळे कारवार पण निश्चितपणे राज्यातील पर्यटक केंद्र बनून राहणार आहे. त्याचबरोबर नियोजित लढाऊ विमान संग्रहालयामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इतकेच नव्हे तर या उपक्रमामुळे अनेकांचे विशेष करून बाळगोपाळांचे व भारतीय सेनेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या युवक आणि युवतींचे लढाऊ विमानाबद्दल असलेले कुतूहल पूर्णत्वाला जाणार आहे.
चार वर्षापासून प्रयत्न
मंत्री पुजारी पायाभरणी प्रसंगी बोलताना म्हणाले, लढाऊ विमान संग्रहालयाच्या उभारणीसाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. संग्रहालयाची उभारणी निर्मिती केंद्राकडून होणार आहे. संग्रहालयाच्या उभारणीनंतर पर्यटन केंद्रासाठी सुप्रसिद्ध असलेल्या कारवार जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला नवी दिशा प्राप्त होणार आहे, असे पुढे पुजारी यांनी सांगितले.