मडगाव भाजप मंडळाचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
मडगावचे चार नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून सर्व काही व्यवस्थित जुळून आल्यास मडगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता येईल असा दावा मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांनी पत्रकार परिषदेत केला. मडगाव पालिकेत सद्या फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे समर्थक पॅनल सत्तेवर आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सातत्याने चालू असतानाच त्यांच्याच गटातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झालेले आहे. भाजपकडे त्यांची प्राथमिक बोलणी झालेली आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना या नगरसेवकांनी काही अटी घातल्याचे वृत्त आहे. या अटी पक्षाच्या नेतृत्वाकडे नेऊन त्याला मान्यता मिळाल्यानंतर या नगरसेवकांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्वेता लोटलीकर यांनी फातोर्डातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर हल्लीच मडगाव मतदारसंघातून महेश आमोणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मडगाव नगरपालिकेत भाजप समर्थक नगरसेवकांचे संख्याबळ 9 वर पोचले आहेत. आणखीत 4 नगरसेवक भाजप प्रवेशासाठी सज्ज झालेले आहे. हे चार नगरसेवक भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची संख्या 13 पर्यंत जाईल. त्यामुळे मडगाव नगरपालिकेत सत्तांतर होईल असा दावा रूपेश महात्मे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दिगंबर कामत यांचा संबंध नाही
मडगाव पालिकेचे चार नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत, त्यात दिगंबर कामत यांचा संबंध नाही अशी माहिती रूपेश महात्मे यांनी दिली.
सर्वांनी तिरंगा आपल्या घरावर लावावा
आझादी का अमृत महोत्सव सद्या देशभरात साजरा केला जात असून मडगावातील नागरिकांनी भारतीय तिरंगा आपल्या घरावर लावावा असे आवाहन यावेळी बाबू आजगांवकर यांनी केले. तसेच 14 ऑगस्ट रोजी मशाल मिरवणूक काढली जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला माजी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर, शर्मद पै रायतूरकर, चंदन नायक तसेच रंजिता पै उपस्थित होत्या.