ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बायोगॅसची ब्रिटिशकालीन टाकी साफ करताना त्यामध्ये पडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील खांडज गावात घडली.
प्रकाश सोपान आटोळे (वय 54), प्रविण भानुदास आटोळे (34), भानुदास आनंदराव आटोळे (60), बापुराव लहुजी गव्हाणे (33) अशी मृतांची नावे आहेत. मयत भानुदास व प्रविण हे पितापुत्र आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खांडज गावच्या हद्दीत असलेल्या आटोळेवस्ती येथे बायोगॅसची ब्रिटिशकालीन टाकी आहे. या टाकीत जणावरांच्या मलमूत्राची साठवण केली जात होती. ही टाकी साफ करण्यासाठी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एकजण टाकीत उतरला. तो टाकीत अडकल्याने त्याला वाचविण्यासाठी अन्य तिघेजण टाकीत उतरले. यावेळी सर्वजण गुदमरून बेशुद्ध झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जेसीबीच्या सहाय्याने टाकी फोडून त्यांना बाहेर काढले. तात्काळ बारामतीमधील सरकारी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.