ट्रकमधून सामान उतरवताना दुर्घटना
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये सोमवारी दुपारी झालेल्या गूढ स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. ट्रकमधून सामान उतरवले जात असताना एका रद्दीच्या दुकानाबाहेर हा स्फोट झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश असून ते स्फोटाच्या वेळी साहित्य उतरवण्यास मदत करत होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी एफएसएल टीमलाही तपासासाठी घटनास्थळी पाचारण केले आहे.
सोपोरच्या शायर कॉलनीमध्ये स्फोटाची दुर्घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले, तर आणखी एक गंभीर जखमी व्यक्तीला विशेष उपचारांसाठी सौरा येथे पाठवण्यात येत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. नजीर अहमद नाद्रू, आझम अश्र्रफ मीर, आदिल रशीद भट आणि अब्दुल रशीद भट अशी मृतांची नावे असून ते शायर कॉलनीतील रहिवासी आहेत.
हा स्फोट एका रद्दीच्या दुकानात झाला. या स्फोटाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे सोपोरच्या एसएसपी दिव्या डी यांनी सांगितले. सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटात सध्या दहशतवादी कनेक्शन समोर आलेले नाही, मात्र पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.