वृत्तसंस्था / अमान (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप महिलांच्या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली. भारताच्या महिला मल्ल मानसी लेथर, पुलकित, नेहा सांगवान आणि आदिती कुमारी यांनी आपल्या वजन गटात अंतिम लढती जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने 4 सुवर्ण आणि 2 कास्य अशी एकूण 6 पदकांची कमाई केली आहे.
महिलांच्या 73 किलो फ्रीस्टाईल वजन गटात मानसी लेथरने, 65 किलो वजन गटात पुलकितने, 57 किलो वजन गटात नेहा सांगवानने आणि 43 किलो गटात आदिती कुमारीने सुवर्णपदके मिळविली. पुरूषांच्या 110 किलो ग्रिको रोमन प्रकारात रोनक दाहीयाने तर 51 किलो ग्रिको रोमन प्रकारात साईनाथ पारधीने प्रत्येकी 1 कास्य पदक घेतले. 19 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू झाली असून रविवारी या स्पर्धेचा समारोप होईल. गेल्या वर्षी या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कास्य अशी एकूण 11 पदकांची कमाई केली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी सुवर्णपदक विजेत्या मानसी लेथरचे अभिनंदन केले आहे.