शस्त्रास्त्रे-स्फोटके जप्त : सीमेपलीकडून ड्रोनद्वारे तस्करीचा पर्दाफाश
कर्नाल / वृत्तसंस्था
हरियाणातील कर्नाल जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्गावरून पोलिसांनी गुरुवारी सकाळी चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. गुरप्रीत, अमनदीप, परविंदर आणि भूपिंदर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते पंजाबचे रहिवासी आहेत. यातील तीन फिरोजपूर आणि एक लुधियाना येथील आहे. चारही दहशतवादी बब्बर खालसा या खलिस्तानी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. हरियाणा-पंजाब पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांचे पथकही दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर चार दहशतवाद्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले चार दहशतवादी एका इनोव्हा कारमधून महामार्गावरून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनंतर, कर्नाल पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बस्तारा टोल प्लाझा येथे नाकाबंदी केली आणि तपासणीसाठी इनोव्हा वाहन थांबवले. पोलिसांनी चौघांना अटक करून वाहनाची झडती घेतली व शस्त्रसाठा जप्त केला. पोलिसांनी चौघांनाही मधुबन पोलीस ठाण्यात नेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
कारवाईनंतर पोलिसांनी व्हिडीओ टीम आणि एसएफएल टीमला घटनास्थळी पाचारण केले. दहशतवाद्यांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 31 काडतुसे, 1.30 लाख रुपयांची रोकड, 3 लोखंडी कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. टीमने त्यांचे एक्स-रे केले असून त्यात स्फोटके असल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी या चार दहशतवाद्यांना मधुबन पोलीस ठाण्यातून सीआयए-1 कर्नाल येथे हलवले आहे. पंजाब पोलीसही चौकशीसाठी येथे पोहोचले आहेत. याशिवाय विविध सुरक्षा यंत्रणांचे प्रमुखही या चौघांची चौकशी करणार आहेत.
पाकिस्तानसोबतचे संबंधही उघड
पाकिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्या इशाऱयावर अटक केलेले चारही संशयित काम करत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. रिंदाने दिलेल्या निर्देशानुसारच त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे पोहोचली होती. ही शस्त्रास्त्रे त्यांना आदिलाबाद (तेलंगणा) येथे नेण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याबदल्यात चौघांनाही मोठी रक्कम देण्यात आली होती. यापूर्वीही त्यांनी नांदेडला शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचे स्पष्ट झाले आहे. रिंदा ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे-स्फोटके पुरवायचा आणि मोबाईल ऍपवरून लोकेशन पाठवायचा. त्यानंतर ते स्फोटके ठराविक ठिकाणी पोहोचवली जात होती, असे एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितले.