मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथील अनाकापल्ले येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. तर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
शिव रामकृष्ण (40 वर्षे), त्यांची पत्नी माधवी (38 वर्षे) आणि दोन मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे. तर रामकृष्ण यांची तिसरी मुलगी वाचली आहे. आर्थिक संकटामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रामकृष्ण हे दागिन्यांचे काम करत होते. काही वर्षांपूर्वी ते अनाकापल्ले शहरात राहण्यासाठी आले होते. येथे एका फ्लॅटमध्ये ते स्वत:च्या कुटुंबीयांसमवेत राहत होते असे प्रारंभिक तपासात आढळून आले आहे.
या कुटुंबाने गुरुवारी रात्री विषप्राशन केले असावे, ज्यानंतर पाच जणांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.