पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या कोंढवा परिसरात एका शाळेतील क्रीडा शिक्षक अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समुपदेशनात उघडकीस आला आहे. नोव्हेंबर 2022 पासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
अविनाश गोविंद चिलवेरी (23, रा. बिडी कामगार वसाहत, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने 37 वर्षीय महिलेने पोलिसांकडे आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. चिलवेरी विरुध्द विनयभंगासह पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : प्राचार्यांना मारहाण करणं भोवलं; आ. बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा आहे. आरोपी चिलवेरी तेथे सात ते आठ महिन्यांपूर्वी क्रीडा म्हणून रुजू झाला होता. तेथील विद्यार्थीनींना जबरदस्तीने मिठी मारुन तो चुंबन घेत होता. तसेच त्यांना व्हॉटस्ऍपद्वारे आयलव्हयू असा मेसेजही पाठवत होता. हा प्रकार नोव्हेंबर पासून सुरु होता. शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘गुड टच बॅड टच’ हा उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता. या समूपदेशादरम्यान, शाळेतील 4 विद्यार्थिनींनी ही बाब उघड केली. त्यानंतर शाळेने मुलींकडे चौकशी करून दोषी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दिली. संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून, कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.