नव्याने 41 जनावारांना लागण : रोगाची तीव्रता वाढू लागली : आत्तापर्यंत 194 जनवारांना बाधा
सांगली / प्रतिनिधी
लम्पी स्कीन त्वचा रोगाचा प्रादूर्भाव वाढतच असून शुक्रवारी दिवसभरात तब्बल 41 नवीन जनावरे बाधित झाले असून चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत आठ जनावरे दगावली आहेत. एकूण बाधित जनावरांचा आकडा 194 झाला आहे.
लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग वाढत असून प्रशासन तो रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. आज दिवसभरात 41 जनावर बाधित झाले असून जिह्यातील सर्व तालुक्यात हा संसर्ग पसरल्याचे समोर आले आहे. शिराळा आणि तासगाव तालुक्यात या रोगाचा प्रादूर्भाव झालेला नव्हता. मात्र, आज शिराळ्यात एक तर तासगावात नऊ जनावरे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. जिह्यात वाळवा तालुक्यातून या संसर्गाचा प्रसार झाला. आज तेथेही दिवसभरात दहा जनावरे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वाळवा तालुक्यातील बाधित जनावरांचा आकडा शंभरवर गेला आहे. या आजाराचा प्रादूर्भाव झाल्यापासून प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने एकाच दिवशी जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा आज 194 झाला.
एकीकडे बाधितांचा आकडा वाढला असला तरी बऱया होणाऱया जनावरांचा आकडाही आज चांगलाच वाढला. 29 बाधित जनावरे आज उपचारानंतर बरी झाले आहेत. तर 137 जनावरांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात आणखी चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मयत जनावरांचा आकडा आठ झाला आहे. मिरज आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी दोन तर वाळवा, जत, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एक लम्पी बाधित जनावर मयत झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लम्पी स्कीनचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. जिह्यात आजवर एक लाख 47 हजार 693 जनावरांचे लसीकरण झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडे दोन लाख 13 हजार 10 लसचे डोस प्राप्त झाले आहेत.
तालुकानिहाय लम्पी स्कीनने बाधित झालेली संख्या ः आटपाडी – 5, जत 7, कडेगाव- 1, कवठेमहांकाळ-7, खानापूर-9, मिरज-39, पलूस – 16, शिराळा – 1, तासगाव – 9, वाळवा 100 अशी एकूण 194 जनावरांना बाधा झाली आहे.