Tarun Bharat

कुडचडेत कारने ठोकरल्याने चार जण जखमी

शिवाजी सर्कलवरील घटना, शाळा सुटून घरी जाणारे तीन विद्यार्थी, एका वयस्कर महिलेचा समावेश

प्रतिनिधी / कुडचडे

कुडचडेतील शिवाजी सर्कल येथे गुरुवारी दुपारी अंदाजे दीड वाजता न्यू एज्युकेशनल  इन्स्टिटय़ूटचे तीन विद्यार्थी व एका वयस्कर महिलेला कारने ठोकरल्यामुळे चारही जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पालक व अन्य लोकांकडून पोलीस व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात हायस्कूल सुटल्यावर झाला. यात शकुंतला खन्ना पंदिधर वय 65, गवळीवाडा-काकोडा, विद्यार्थी साक्षी श्रीनिवास पंदिधर वय 13, सुविधा सुरेश तनगडगी वय 14, सुदिक्षा सुरेश तनगडगी वय 15 हे सर्व जण जखमी झाले असून कारचा चालक अदनान अब्दुल शेख, वय 32 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सुदिक्षा तनगडगी व शकुंतला खन्ना पंदिधर यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळामध्ये उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा पंचनामा निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नीलेश काकोडकर यांनी केल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली.

पोलीस नसल्याने संताप

सदर विद्यार्थी व त्यांच्यासोबत राहून त्यांना घरी नेणाऱया वयस्कर महिला चालत जात होत्या. त्यावेळी अचानक या चारही जणांना कारने ठोकरल्याने शिवाजी सर्कलवर एकच गोंधळ माजला. लोकांनी या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यातील शाळा सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले आहेत. एरव्ही कुडचडे बाजारात तसेच आजुबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी वाहतूक पोलीस हेल्मेट व इतर गोष्टी तपसण्यासाठी तैनात असतात व चलन देत असतात. पण दुपारच्या वेळेस शाळा सुटतात तेव्हा कुठेही पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे हा अपघात घडलेला आहे, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होताना ऐकू आली.

त्याचबरोबर कुडचडे बाजार परिसरात धावणाऱया दुचाकी व चारचाकी वाहनांवर कोणतेच नियंत्रण राहिलेले नसून नवीन पिढी तुफान वेगाने दुचाकी व चारचाकी वाहने हाकते. याला जबाबदार कोण, असा सवाल लोकांनी केला आहे. अशा प्रकारे अपघात होण्यास सुरुवात झाली, तर विद्यार्थ्यांनी कोणत्या रस्त्याने शाळेत जायचे व घरी परत कसे यायचे असा प्रश्न लोकांकडून प्रशासनाला विचारण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांना कारने ठोकरल्याने ते बाजूला फेकले गेले. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी शाळा सुटण्याच्या वेळेस जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण विद्यार्थी एका बाजूने रांगेत जात असले, तरी लहान असल्यामुळे त्यांचे लक्ष दुसऱया गोष्टींवर असण्याची जास्त शक्यता असते व ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया पुष्कल सावंत यांनी व्यक्त केली.

Related Stories

मंत्री राणे सूडाने आपला धंदा बंद पाडू पाहतात

Amit Kulkarni

महिला आणि मुलांविरुद्धच्या गुह्यांवर कडक कारवाई – डॉ.सावंत

Amit Kulkarni

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे विमानतळावर स्वागत

Amit Kulkarni

बोरी येथील धोकादायक जुन्या पुलाच्या मोडकळीचे काम पूर्ण

Patil_p

अपक्ष की कुठल्या पक्षात जायचे याबाबत विचार सुरु

Amit Kulkarni

गो.सु.म तर्फे येणाऱया काळात म्हादईचा लढा अधिक तिव्र

Patil_p