वृत्तसंस्था/ झुरिच
गेल्या महिन्यात कतारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत खेळताना उरुग्वेच्या चार फुटबॉलपटूंनी सामनाधिकारी आणि पंचांशी मैदानावर बेशिस्त वर्तन केल्याने फिफाने या चार खेळाडूंवर प्रत्येकी 4 सामन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
फिफाने बंदी घातलेल्या उरुग्वेच्या चार फुटबॉलपटूंमध्ये फर्नांडो मुसलेरा, ज्योस मारिया गिमिनेझ तसेच एडिनसन कॅव्हेनी व दियागो गॉडीन यांचा समावेश आहे. कतारमध्ये झालेल्या या स्पर्धेत उरुग्वेचे आव्हान लवकरच समाप्त झाले होते. फिफाच्या शिस्तपालन समितीने उरुग्वेच्या या फुटबॉलपटूंवर ही कारवाई केली आहे. कॅव्हेनी आणि गॉडीन यांच्यावर एक सामन्याची बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे मैदानावर बेशिस्त वर्तन करणाऱया उरुग्वेच्या या फुटबॉलपटूंना प्रत्येकी 21,600 डॉलर्सचा दंडही फिफाने ठोठावला आहे. फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत उरुग्वेला शेवटच्या 16 संघांमध्ये प्रवेश करता आला नव्हता. या स्पर्धेत 2 डिसेंबर रोजी झालेल्या प्राथमिक गटातील शेवटच्या सामन्यात उरुग्वेने घानाचा 2-0 असा पराभव केला होता. या सामन्यात वरील चार खेळाडूंनी सामनाधिकारी आणि पंच यांच्याविरुद्ध मैदानात बाचाबाची केली होती. उरुग्वेच्या फुटबॉल फेडरेशनने या चारही फुटबॉलपटूंना प्रत्येकी 54 हजार डॉलर्सचा दंडही ठोठावला आहे.