प्रतिनिधी /फोंडा
कुर्टी येथे फोंडा-बेळगाव महामार्गावर मंगळवारी सायंकाळी चार वाहनांमध्ये अपघात झाला. त्यात दोन प्रवासी बसेससह दोन कारगाड्यांचा समावेश आहे. या अपघातात प्रवासी किंवा वाहनचालक यापैकी कुणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांची बरीच नुकसानी झाली. कोपरवाडा-कुर्टी येथील जंक्शनवर हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार चारही वाहने उसगांवहून फोंड्याच्या दिशेने जात होती. सर्वात पुढे असलेल्या जीए 05 टी 1337 या क्रमांकाच्या झायलो जीपगाडीने कोपरवाडा-कुर्टीकडे जाण्यासाठी वळण घेतले. यावेळी पाठिमागे असलेल्या जीए 05 डी 7644 या सिलेरियो कारगाडीने ब्रेक लावला. याचवेळी मागे असलेल्या कर्नाटक राज्यातील एसटी बसने ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात सिलेरियो कारला धडक दिली. त्यामुळे कारगाडीचा एसटी व झायलो जीपगाडीमध्ये अडकून चक्काचूर झाला. तसेच जीए 02 यू 4043 या अन्य एका खासगी मिनीबसला एसटी बसने निसटती धडक दिली. या विचित्र अपघातात सिलेरियो कारगाडीची मोठ्याप्रमाणात नुकसानी झाली असून झायलो जीपगाडी व मिनी बसची कमी अधिक हानी झाली. सुदैवाने या अपघातात प्रवासी किंवा वाहन चालकांना कुठलीही इजा झालेली नाही. दरम्यान याठिकाणी महामार्गाच्या बाजूला सर्व्हिस रोडवर थाटलेला भंगारअ•ा व गॅरेजमुळे वाहतूकीत कायम व्यत्यय येत असून ही अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित करण्याची मागणी काही स्थानिकांनी केली आहे.