63 लाखांचा दंड, बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी न्यायालयाचा दणका
प्रतिनिधी /बेळगाव
हुमनाबाद (जि. बिदर) येथील एआरटीओने बेहिशोबी मालमत्ता जमविली होती. याप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी तपास करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी सुनावणी होऊन माया जमविणाऱया एआरटीओ पी. शांतकुमार पुन्नास्वामी याला 4 वर्षांचा कारावास आणि 63 लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.
एआरटीओ पी. शांतकुमार याने भ्रष्टाचार करून मोठी माया जमविली होती. बेकायदेशीररित्या ही माया जमविली होती. बेळगाव येथील अंजनेयनगर येथे अलिशान इमारत बांधली होती. याबद्दल त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर धाड टाकली असता 1 कोटी 62 लाख 14 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघडकीस आले होते.
तत्कालीन लोकायुक्त पोलीस निरीक्षक आर. पी. पाटील, पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले होते. येथील चौथे अतिरिक्त जिल्हासत्र आणि विशेष न्यायालयामध्ये साक्षीदार तसेच कागदपत्रे तपासण्यात आली. त्यामध्ये पी. शांतकुमार हा दोषी आढळला. यामुळे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी त्याला चार वर्षांचा कठीण कारावास आणि 63 लाख रुपये दंड ठोठावला. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले.