Tarun Bharat

लखनौ सुपर जायंट्सचा चौथा विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

कर्णधार व सामनावीर केएल राहुलचे आयपीएलमधील तिसरे शतक आणि अवेश खानसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱयामुळे लखनौ सुपर जायंट्सने शनिवारी झालेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करून दुसऱया स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा पराभव असून आयपीएलमधील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

राहुलने आपल्या 100 व्या आयपीएल सामन्यात 60 चेंडूत नाबाद 103 धावा फटकावल्या. आयपीएलमधील त्याचे हे एकूण तिसरे शतक आहे. त्याच्या शतकामुळे लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 4 बाद 199 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 9 बाद 181 धावांवर रोखत 18 धावांनी विजय मिळविला. लीगमधील सर्वात लोकप्रिय संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचे, सलग सहा पराभवामुळे स्पर्धेचा अर्धा टप्पा पूर्ण होण्याआधीच आव्हान संपुष्टात आले आहे.

कर्णधार रोहित शर्माचा (6) खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला तर सर्वात महागडा खेळाडू इशान किशनवर (17 चेंडूत 13) 15.25 कोटीच्या दडपणाचे ओझे परिणाम करीत असल्याचे दिसून येत आहे. स्टोईनिसने त्याला त्रिफळाचीत केल्यानंतर तंबूत परतताना फोमच्या सीमारेषेवर रागाने बॅट आपटत त्याने निराशा व्यक्त केली. डेवाल्ड ब्रेव्हिसने आधीच्या सामन्याप्रमाणे काही धाडसी फटके मारत 13 चेंडूत 31 धावा झोडपल्या. त्यानंतर या मोसमातील फाईंड ठरलेला एनटी तिलक वर्मा (26 चेंडूत 26) व भरवशाचा सूर्यकुमार यादव (27 चेंडूत 37) यांनी 64 धावांची भागीदारी करून संघाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. जेसॉन होल्डरने तिलक वर्माला यॉर्करवर बाद केल्यानंतर मुंबईच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. सूर्यकुमार एकाकी लढत देण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याला दुसऱया बाजूने साथ मिळत नव्हती. बिश्नोईने त्याला बाद केल्यानंतर पोलार्डने (14 चेंडूत 25) अखेरच्या टप्प्यात थोडीफार फटकेबाजी केली तरी ती मुंबईला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. लखनौचा वेगवान गोलंदाज अवेश खान (30 धावांत 3 बळी) व मध्यमगती गोलंदाज दुश्मंता चमीरा (1-48) यांना होल्डर (1-34), स्टोईनिस (1-13) यांच्याकडून चांगली साथ मिळाली.

लखनौचा हा सहा सामन्यातील चौथा विजय असून पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱया मुंबई इंडियन्सचा सलग 12 वा पराभव आहे. मागील आवृत्तीतही त्यांनी शेवटचे सहा सामने गमविले होते. त्यांच्या बाबतीत 15 वर्षांत पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. त्यांनी ज्या खेळाडूंना निवडले आहे ते पाहता यापुढील लढतीतही त्यांच्याकडून अपेक्षा धरता येणार नाही. शिवाय त्यांच्याकडे प्लॅन बी देखील नाही, आणि असलाच तरी ते अंमलात आणू शकणारे खेळाडू त्यांच्याकडे नाहीत.

राहुलसाठी कर्णधार व फलंदाज दोन्ही बाबतीत ही स्पर्धा त्याची गुणवत्ता सिद्ध करणारी ठरत असून राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाचा विचार करता तो भविष्यातील दावेदार ठरू शकेल, अशी पार्श्वभूमी त्याने तयार केली आहे. शतक नेंदवताना  क्विन्टॉन डी कॉकसमवेत (13 चेंडूत 24) त्याने 52 धावांची सलामी दिली तर मनीष पांडेसमवेत 72 आणि दीपक हुडासमवेत (8 चेंडूत 15) चौथ्या गडय़ासाठी जलद 43 धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्सचे गचाळ क्षेत्ररक्षणही राहुलसाठी मदतगार ठरले. रोहित शर्माने जादा स्पिनर (फॅबियन ऍलेन) खेळविण्याचा निर्णय घेतला. पण तो निष्फळ ठरला. बुमराहवर साऱया अपेक्षा असल्या तरी तो एकटा संघाला संकटातून वाचवू शकत नाही. उनादकट (2-32) व मुरुगन अश्विन (1-33) यांनी आपल्या परीने प्रयत्न केले, पण त्यांना पुरेसे यश मिळाले नाही. 13 ते 16 या षटकात लखनौने 60 धावांची भर घातली होती. 

संक्षिप्त धावफलक ः लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 4 बाद 199 ः केएल राहुल नाबाद 103 (60 चेंडूत 9 चौकार, 5 षटकार), डी कॉक 24 (13 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे 38 (29 चेंडूत 6 चौकार), स्टोईनिस 10 (9 चेंडूत 1 षटकार), दीपक हुडा 15 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कृणाल पंडय़ा नाबाद 1, अवांतर 8. गोलंदाजी ः उनादकट 2-32, एम.अश्विन 1-33, ऍलेन 1-46, टायमल मिल्स 0-54 (3 षटके), बुमराह 0-24.

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 181 ः इशान किशन 13 (17 चेंडूत 2 चौकार), रोहित शर्मा 6 (7 चेंडूत 1 चौकार), ब्रेव्हिस 31 (13 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार यादव 37 (27 चेंडूत 3 चौकार), तिलक वर्मा 26 (26 चेंडूत 2 चौकार), पोलार्ड 25 (14 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), उनादकट 14 (6 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), एम. अश्विन 6 (2 चेंडूत 1 षटकार), बुमराह व मिल्स नाबाद 0, अवांतर 15. गोलंदाजी ः अवेश खान 3-30, होल्डर 1-34, चमीरा 1-48, बिश्नोई 1-34, स्टोईनिस 1-13, कृणाल 0-16 (2 षटके).

Related Stories

न्यूझीलंडच्या टी-20 वर्ल्डकप जर्सीचे अनावरण

Amit Kulkarni

पुरुष सांघिक तिरंदाजीत दक्षिण कोरिया विजेते

Patil_p

दुसऱया ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत रिझवी, रजपूतचे यश

Patil_p

‘तो’ विक्रम न केल्याबद्दल युवराजने मानले आभार!

Patil_p

नीरजची भालाफेक ऑलिम्पिकच्या 10 मॅजिकल मोमेंट्समध्ये!

Patil_p

एफसी गोवाची आज सलामीची लढत बेंगलोरशी फातोडर्य़ात

Patil_p
error: Content is protected !!