लोणावळा / प्रतिनिधी :
लोणावळा शहराच्या लगत असलेल्या कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय तुकाराम गुंड (वय 42, रा. कुसगाव, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.
कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सुरज दत्ता केदारी (रा. श्रमदान नगर ओळकाईवाडी), राजेश बबन काटकर (रा. ओळकाईवाडी), मंदाकिनी जालिंदर झगडे (रा. कुसगाववाडी), शैला भरत मोरे (रा. प्रेमनगर), सुजाता रामचंद्र ठुले (रा. क्रांतीनगर) आणि फरीन मज्जीद शेख (रा. गुरववस्ती) यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 120(ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : नाशकात ठाकरे गटाला खिंडार; डझनभर माजी नगसेवक शिंदे गटात सामील
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जून 2022 ते 27 जुलै 2022 दरम्यान कुसगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व वरील सदस्यांनी संगणमत करून दिनांक 30/06/2022 रोजीच्या सभेच्या अजेंडय़ामध्ये विषय क्रमांक 5 मधील अर्ज क्रमांक 28 मध्ये रिकाम्या ओळी सोडून अजेंडा पूर्ण केला. त्यानंतर रिकाम्या सोडलेल्या ओळीमध्ये मी संजय गुंड कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नसताना त्यांनी माझ्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा लिहून त्यावर माझी खोटी सही करून तो खरा असल्याचा भासवला. तसेच संबंधित राजीनामा अर्ज मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पाठवला. माझे ग्रामपंचायत सदस्यपद रिक्त करून माझी फसवणुक केली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गुंड यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पुढील तपास करत आहेत.