मिरजेतील वैमानिकाची फसवणूक, नोयेडा येथील तरुणीवर गुन्हा
प्रतिनिधी/मिरज
पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन तुमच्याशी लग्न करतो, असे सांगून नोयेडा येथील एका भामट्या तरुणीने विमान कंपनीतील वैमानिकाला तब्बल 58 लाख, 92 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अतिश शशिकांत शिंगे (वय 48, रा. यश निवास, सुंदरनगर, आनंद नर्सिंग होमजवळ, सांगली-मिरज रस्ता, मिरज) असे फसवणूक झालेल्या वैमानिकाचे नाव आहे. याबाबत शिंगे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून, हना मोहसीन खान (रा. सेक्टर 52, नोयेडा, उत्तर प्रदेश) हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अतिश शिंगे हे एका विमान कंपनीत वैमानिक पदावर नोकरीस आहेत. ते सध्या नोकरी निमित्त यशकुंज, उत्तमनगर, गोरेगांव, वेस्ट मुंबई येथे राहण्यास आहेत. विमान कंपनीतील नोकरीच्या माध्यमातून त्यांची हना हिच्याशी 2016 साली ओळख झाली होती. हना हिलाही पायलट बनायचे होते. यासाठी तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन शिंगे यांच्याशी विवाह करण्याचे वचन दिले होते. पायलट होण्यासाठी सर्व खर्च तिने शिंगे यांच्याकडूनच घेतला. या बदल्यात पायलट झाल्यानंतर वडीलांच्या जमीनीचे शासनाकडून 12 कोटी रुपये मिळणार असून, तेही तुमच्या नावावर करुन देण्याचे अमिष हना हिने शिंगे यांना दाखविले होते.
सदर तरुणीच्या अमिषाला बळी पडून अतिश शिंगे यांनी 2016 पासून आत्तापर्यंत तब्बल 58 लाख, 92 हजार रुपये वेळोवेळी दिले. मात्र, आजतागायत संबंधीत तरुणीने शिंगे यांच्याशी विवाहही केला नाहीत. तसेच पायलट झालेल्यानंतर घेतलेले पैसही परत दिले नाहीत. शिंगे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे.