Tarun Bharat

रोजगाराच्या नावाखाली कोटय़वधींची फसवणूक

निपाणी परिसरातील महिला पडल्या फशी : पोलीस प्रशासनासमोर तपासाचे आव्हान : लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज

वार्ताहर / निपाणी

निपाणी शहर व परिसरात एक गृहोद्योग कंपनी कार्यरत होताना महिलांना रोजगार देण्यासाठी आश्वासित करत होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कंपनीने सुरुवातीला काही महिलांना अनामत घेत रोजगार देत मोबदलाही दिला. कमी गुंतवणूक, कष्टही कमी पण रोजगार मात्र नियमित अशा भूलथापांना हजारो महिला बळी पडल्या. मोठय़ा प्रमाणात महिलांनी नोंदणी करत कंपनीने आपला गाशा गुंडाळला. यातून निपाणी शहर व ग्रामीण भागातील महिलांची कोटय़वधींची लुबाडणूक झाल्याचे उघड झाले आहे.

बटनला रंग लावणे, प्रेस मशीनद्वारे बटनाला कापड प्रेस करणे, बटनाचे पॅकिंग करणे याप्रकारे बटन व्यवसायातून रोजगार देण्याचे आमिष दाखविले जात होते. यासाठी 3500 रुपये देऊन नोंदणी केली जात होती. त्याचप्रमाणे 6 हजार देऊन मशीनही दिली जात होती. या दोन्ही प्रकारात 3 हजार व 6 हजार रुपये प्रति आठवडा रोजगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

कंपनी चालक पसार

सुरुवातीला काही महिलांना रोजगार देण्यात आला. त्यांचे नियमित उत्पन्नही दिले जाऊ लागले. याची माहिती देण्यासाठी शहर व ग्रामीण भागात महिला कमिशन एजंट नेमण्यात आल्या. या एजंट महिलांनी अधिक सभासद दिल्याने त्यांना कंपनीने दुचाकीची भेटही दिली. स्थानिक एजंटामार्फत रोजगारासाठी अनेक महिला अनामत रक्कम देऊन सभासद बनल्या. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागातून पाच हजारांवर महिलांचा अनामत रकमेसह सहभाग होता. सुमारे 15 कोटींवर रक्कम कंपनीने जमविली. यानंतर संबंधित कार्यालय बंद असून कंपनी चालकही पसार झाला आहे.

या रोजगाराविषयी संशय वाढल्याने गेल्या आठ दिवसांपूर्वी काही सुज्ञ नागरिक व पत्रकारांनी विचारणा केली होती. या कंपनीमध्ये सहभागी असणारे एजंट व सदस्यांनी ही कंपनी पारदर्शी काम करते. तुम्ही संशय वाढवून अपमान करत आहात, आम्हाला नियमित रोजगार मिळत आहे, जर हे योग्य नसेल तर तुम्ही रोजगार देणार का?, असा उलट सवाल केला होता.

आम्हाला न्याय द्या

पोलिसांनी याचवेळी एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली पण यातून काहीच साध्य झाले नाही. कंपनी चालक बेपता व कार्यालयही बंद यामुळे महिलांना दिला जाणारा रोजगार थांबला. यामुळे आम्ही फसलो गेलो, अशी भावना निर्माण झाल्याने गुरुवारी महिलांनी निपाणी येथील कार्यालयासमोर गर्दी केली. यावेळी पोलीस व सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

यावेळी महिलांनी आम्हाला न्याय द्या, आम्ही गुंतवलेले पैसे परत मिळवून द्या, अशी मागणी केली.

प्रसंगी न्यायालयीन लढा देणार

यावेळी बोलताना गुन्हे अन्वेषणचे फौजदार डी. बी. कोतवाल म्हणाले, महिलांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याकरिता तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, झाकीर कादरी यांनी संबंधितांवर कारवाई करावी, महिलांचे पैसे परत मिळवून द्या. प्रसंगी स्वखर्चाने न्यायालयीन लढा देणार आहोत, असे सांगितले.

सूत्रधाराला दिले पोलिसांच्या ताब्यात पोलीस प्रशासन गेल्या आठ दिवसांपासून या प्रकारची चौकशी करत आहे. यासाठी संशयित प्रताप याला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला देखील ताब्यात घेतले जाईल, तपास सुरू आहे, असे सांगितले. तोच या कंपनीच्या माध्यमातून सदस्य करणाऱया स्थानिक एजंटानी अशोक या मुख्य सूत्रधार असलेल्या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असे बोलले जात आहे. 

Related Stories

जी. जी. चिटणीस, इस्लामिया अंतिम फेरीत

Amit Kulkarni

दुर्गामाता दौड यंदा साध्या पद्धतीने

Amit Kulkarni

खानापुरात नवरात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ

Amit Kulkarni

‘एक गाव एक गणपती’ परंपरा ओलमणी येथे कायम

Amit Kulkarni

देसूर येथे चक्क गवीरेडे गावात दाखल

Amit Kulkarni

सीसीआय बेळगाव संघाचा 50 धावाने विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!