व्हॉट्सऍपद्वारे ओळख वाढवून दाखविले अमिष, पावणे अकरा लाख रूपये केले ट्रान्सफर
प्रतिनिधी/ सातारा
फलटण शहरातील डॉक्टरला फोन करून एल.पी.जी गॅसची एजन्सी देतो असे अमिष दाखवले. व्हाट्सऍप कॉल, चॅटिंगच्या माध्यमातून ओळख वाढवून 10 लाख 79 हजार रूपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. हे पैसे पाठवल्यानंतर डॉक्टरला बनावट कागदपत्रे पाठवून एजन्सी न देता त्यांची फसवणूक केली. डॉ. रविंद्र सोनवणे असे त्यांचे नाव असून त्यांनी फलटणच्या शहर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सप्टेंबर महिन्यात डॉ. रविंद्र सोनवणे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. यावेळी विकास भास्कर व मनिष ग्रोवर अशा दोन्ही व्यक्तांशी त्यांचे बोलणे झाले. या दोघांनी एल.पी.जी. गॅसची एजन्सी देतो असे अमिष त्यांना दाखवले. या अमिषाला बळी पडून डॉ. रविंद्र यांच्यासोबत विकास व मनिष या दोघांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून ओळख वाढवली. त्यांच्याकडून एजन्सीच्या नावाखाली वेळोवेळी रक्कम घेतली. अवघ्या दोनच महिन्यात रविंद्र यांच्याकडून एन.एफ.टी. द्वारे 10 लाख 79 हजार रूपये उकळण्यात दोघांना यश आले. त्यांनी रविंद्र यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट शिक्के व सही मारून ऍप्रुवल व इनव्हाईस बिले पाठवली. खूप दिवस होऊनही एजन्सी न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.