मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या हस्ते शुभारंभ
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी गुरुवारी राज्यातील इयत्ता पहिली ते 5 वीपर्यंतच्या शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यासाठी मोफत ब्रेकफास्ट योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शालेय मुलांना न्याहरीचे पदार्थ वाढून आणि त्यांच्यासोबत बसून ते खाल्ले आहेत. ही योजना गरीब लोकांच्या जीवनात लाभदायक बदल घडवून आणणारी असल्याचे उद्गार स्टॅलिन यांनी काढले आहेत.
अमेरिका आणि युरोपमध्ये अशाप्रकारचा कार्यक्रम राबविला जाते. अशाप्रकारच्या ब्रेकफास्ट योजनांमुळे मुलांमध्ये शिकण्याच्या कौशल्यात सुधारणा झाली असून तेथील मुलांची शाळेतील हजेरीही वाढली असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. या योजनेच्या अंतर्गत एकूण 33.56 कोटी रुपये खर्च केले जाणार असून यातून राज्यातील 1 लाख 14 हजार 95 विद्यार्थ्यांना लाभ मिळळार आहे. ही योजना एकूण 1,545 शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे. हा या योजनेचा पहिला टप्पा असणार आहे.
चेन्नईच्या शासकीय शाळांमधील पाहणीदरम्यान अनेक मुले न्याहरी न करताच आल्याचे समजले. अशा स्थितीत मुलांना योग्यप्रकारे शिक्षण घेता येणार नाही. याचमुळे ब्रेकफास्ट योजना सुरू करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या योजनेत एका मुलामागे प्रतिदिन 12.75 रुपयांचा खर्च येत असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले आहे.