वितरण प्रक्रियेत सातत्याची गरज, कामगारांना लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कामगार खात्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या मोफत बसपास वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जवळच्या ‘ग्राम वन’ किंवा ‘कर्नाटक वन’ ऑनलाईन सेंटरवर अर्ज करून विनामूल्य बसपास काढून घ्यावेत, असे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात 2लाख 6हजार 96 इतकी बांधकाम कामगारांची नोंद आहे. तर बोगस बांधकाम कामगारांची संख्यादेखील अधिक आहे. कामगारांना कामासाठी ठिकठिकाणी फिरावे लागते. यासाठी कामगार खात्यांकडून मोफत बसपास उपलब्ध करून दिले जात आहेत. यामध्ये पुरुषांबरोबर महिलांची संख्यादेखील अधिक आहे. या महिलांनादेखील हे बसपास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी कामगार खात्याने कंबर कसली आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सप्टेंबर 2022 पासून मोफत बसपास वितरण केले जात आहे. मात्र ही प्रक्रिया सातत्याने बंद ठेवली जात आहे. पुन्हा आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र आता किती कामगारांना बसपास वितरीत करणार हेच पाहावे लागणार आहे. या प्रक्रियेत सातत्य नसल्याने मोजक्याच कामगारांना मोफत बसपास उपलब्ध झाले आहेत. कामगारांना पहिल्या टप्प्यात बसपास उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत बसपास वितरण थांबविण्यात आले होते. त्यानंतर मध्यंतरी काही कामगारांना बसपास देण्यात आले. पुन्हा ही प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी बांधकाम कामगार मोफत बसपासपासून वंचित राहिले हेते. पुन्हा मोफत बसपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बसपास वितरण प्रक्रियेत सातत्य राखून सर्व कामगारांना बसपास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीदेखील कामगार वर्गातून होत आहे.