चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचा नवा उपक्रम
रत्नागिरी प्रतिनिधी
चिपळूण – कर्करूग्णांना वेळीच वैदयकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या विचाराने चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरने रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी रत्नागिरी ते चिपळूण अशी मोफत बस सेवा योजना सुरू केली आहे. दर आठवड्याला सोमवार ते शनिवार ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेद्वारे कर्करूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहचवण्यात मदत मिळत आहे. यामुळे रुग्णांचा प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत होणार आहे.
कर्करूग्णांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा जवळ उपलब्ध नसल्याने दूरवर उपचारासाठी पायपीठ करावी लागते. वेळीच निदान न झाल्याने उपचारासाठी विलंब होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. रत्नागिरीत राहणाऱ्या रूग्णांना उपचारादरम्यान बस, एसटी यांसारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे खूप जिकिरीचे असते. हे लक्षात घेऊन चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मारूती मंदीर, कुवारबाव, हातखंबा, संगमेश्वर, चिपळूण एस.टी बस स्टॅंड या ठिकाणी या बस सेवेचे थांबे असणार आहेत. नागरिकांना वेळेवर रूग्णालयात पोहोचून तातडीने त्यावर उपचार सुरू व्हावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरद्वारे करण्यात येत आहे.
बस कुठे पोहोचली किंवा किती वाजता येईल, याबद्दल अधिक माहितीसाठी ७३७८९५८००० किंवा ९१७५९९५७७५ या क्रमांकावर संपर्क करू शकता.