वडगाव येथील सरकारी पीयू कॉलेजचा उपक्रम : बॉसकॉस पब्लिकेशनचे साहाय्य : इतर कॉलेज विद्यार्थ्यांचाही सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही सीईटी, नीट यासारख्या परीक्षांना गरिबीमुळे सामोरे जाता येत नाही. खासगी क्लासेसचे शुल्क परवडणारे नसल्याने विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सीईटी, नीटसारख्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी वडगाव येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेजच्या प्राध्यापकांनी मोफत मार्गदर्शन सुरू केले आहे. यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळू लागले आहे.
वडगाव येथील जेल शाळेच्या परिसरात सरकारी पीयू कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये प्रथमवर्ष विज्ञान विभागाला 67 तर द्वितीय वर्षाला 33 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सीईटी व नीट परीक्षांच्या तयारीसाठी या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून प्राध्यापक मार्गदर्शन करीत आहेत. मंगळूर येथील बॉसकॉस या पब्लिकेशनने यासाठी आवश्यक अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
इतर कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी
गरजू विद्यार्थ्यांना परीक्षांचे मार्गदर्शन करणे हा मुख्य हेतू असल्यामुळे जवळपासच्या इतर कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी होत आहेत.
पुढील काळात बाहेरून तज्ञ मार्गदर्शक बोलाविण्यात येणार आहेत. शनिवार व रविवारी विद्यार्थ्यांना वेळ असतो. त्या दिवशी विद्यार्थ्यांना 3 ते 4 तास मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रा. एन. बी. मरेन्नावर, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. एस. चुळेकर मोफत वर्ग घेत आहेत.
गरीब मुलांना होतोय फायदा
आमच्या कॉलेजमध्ये केवळ शहरी भागातूनच नाही तर आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही येतात. सर्वांनाच सीईटी व नीटचे खासगी क्लास लावणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आमच्या प्राध्यापकांसोबतच इतर कॉलेजच्या प्राध्यापकांचे यासाठी सहकार्य मिळत आहे. याचा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
श्रीशैल कापसे (प्राचार्य, सरकारी पदवीपूर्व कॉलेज, वडगाव)
मोफत मार्गदर्शन सोयीचे
आम्हालाही इंजिनिअरिंगसह इतर शाखांना प्रवेश घ्यावासा वाटतो. यासाठी सीईटी, नीट यासारख्या परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांसाठी लाखो रुपये खर्च करून खासगी क्लास लावावे लागतात. परंतु हे आम्हाला परवडणारे नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेले मोफत क्लास आम्हाला सोयीचे ठरत आहेत.
सृष्टी अगसीमनी (विद्यार्थिनी)