वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्य प्रदीप पाटील यांच्या प्रयत्नाने व डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगाव यांच्या सौजन्याने मराठी प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य प्रदीप पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील, जयराम पाटील, बाळू दोडमनी, मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोहन भैरटकर, सामाजिक कार्यकर्ते मयूर बसरीकट्टी, मल्लाप्पा पाटील, ग्रा. पं. सदस्या भारता पाटील, मेनका कोरडे, वंदना चव्हाण, रेखा इंडीकर, जगन्नाथ चव्हाण उपस्थित होते.
यावेळी डॉ. शबानी प्रियदर्शी, डॉ. ऋषिकेश पटनाईक, ओमकार पाटील उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, हात-पाय दुखी, सांधे दुखी आदी व्याधींवर उपस्थित डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना पुढील सल्ला देण्यात आला. यावेळी 100 ते 150 नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली.
वरीलपैकी कोणताही आजार झाल्यास तो अंगावर न काढता त्यावर त्वरित उपचार करून घेतल्यास आजार आटोक्यात येतो, असा सल्ला डॉक्टरांकडून वयोवृद्ध नागरिकांना देण्यात आला.