प्रतिनिधी / बेळगाव
ऑस्ट्रेलिया येथील ‘लाईफ फॉर अ चाईल्ड’ व केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्रातील मधुमेह विभागाच्यावतीने मधुमेह पीडित मुलांना मोफत इन्सुलिन वितरणाला बुधवारी चालना देण्यात आली. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दीपप्रज्वलन करून इन्सुलिन वितरणाला प्रारंभ केल्यानंतर डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून मधुमेह पीडित मुलांच्या उपचारांचे कार्य सुरू आहे. मधुमेह आज घराघरात आहे. आहारपद्धती, बदलती जीवनशैली यामुळे मधुमेह रुग्णात वाढ होत आहे. जन्मजात मुलांचीही मधुमेह तपासणी करण्याची वेळ वैद्यकीय क्षेत्रावर येऊन ठेपली आहे.
मधुमेह पीडित मुलांच्या उपचाराचा खर्च प्रत्येकाच्या खिशाला परवडेलच असे नाही. त्यामुळेच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकरी हा नेहमी श्रमजीवी असतो. त्यालाही आज मधुमेहाची लागण होत आहे. बदलत्या आहारपद्धतीच त्याला कारणीभूत असल्याचे डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.
एकाच छताखाली 2 हजार 400 बेड, बेळगाव दक्षिण विभागात 500 बेड, चिकोडी, हुबळीसह 4 हजार बेडचे इस्पितळ सुरू करण्यात आले आहे. केएलई संस्था दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने कार्यरत आहे, असे सांगून प्रभाकर कोरे यांनी डॉ. एम. व्ही. जाली दाम्पत्याचे कौतुक केले.
यावेळी डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. सुजाता जाली, डॉ. तन्मया मेटगुड, डॉ. संतोष पाटील, डॉ. संजय कुंभार, डॉ. राजेंद्र देगिनाळ, लीला आदी उपस्थित होते. डॉ. प्राची नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्योती यांनी आभार मानले.