धनाढय़ शहरात गरीबांसाठी विशेष व्यवस्था
स्वतःच्या झगमगाटासाठी आणि आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध दुबईने गरीबांना एक विशेष भेट दिली आहे. येथे गरीब लोकांसाठी मोफत गरम ब्रेड प्रदान करणाऱया यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. आखातातील या देशात धनाढय़ांची संख्या कमी होऊ नये आणि अथक परिश्रम करणाऱया स्थलांतरितांचे राहणीमानही सुधारावे असा संदेश यातून देण्यात आला आहे. ब्रेड मशीनबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
10 यंत्रांमधून मिळणार ब्रेड
दुबई हे अत्यंत महागडे शहर आहे. गगनचुंबी इमारती असणाऱया या शहरात दोनवेळचे अन्न मिळविणे अवघड ठरू लागले आहे. दुबईत प्रामुख्याने अन्नधान्याची आयात करण्यात येते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगात वेगाने महागाई वाढली असून दुबईतही याचा प्रभाव दिसून येत आहे. या महागाईचा प्रभाव गरीबांवर पडू नये म्हणून दुबईत पीटा ब्रेड किंवा भारतीय शैलीतील गरम रोटी मोफत देतील अशी 10 वेंडिंग मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. या मशीन्समध्ये कॉम्प्युटर टच स्क्रीन असून लोकांना स्वतःच्या पसंतीच्या रोटींचा पर्याय निवडता येतो. पीटा ब्रेड किंवा भारतीय रोटींसह सँडविचसाठीही ब्रेड निवडता येणार आहे. मशीनमध्ये एक क्रेडिट कार्ड रीडर देखील आहे, परंतु ते कुठल्याही देणगी किंवा पेमेंटसाठी नाही.
ही वेंडिंग मशीन्स दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांच्या फौंडेशनकडून बसविण्यात आली आहेत. या फौंडेशनच्या संचालिका जैनब जुमा अल तमीमी यांनी या मशीन्सचा गरीबांना लाभ होणार असल्याचे म्हटले आहे. गरजेच्या वेळी कुणीही केवळ एक बटन दाबून गरम भाकरी किंवा ब्रेड मिळवू शकतो असे त्यांनी सांगितले. युएईची लोकसंख्या सुमारे 10 कोटी असून यातील 90 टक्के लोक विदेशी आहेत. या 90 टक्क्यांमध्ये आशिया आणि आफ्रिकेतून आलेले अनेक कामगार आहेत.