Tarun Bharat

महाराष्ट्र विधानभवनाच्या पायरीवरच ‘फ्री स्टाईल’

राजकारणाची पायरी घसरली; सत्ताधारी-विरोधी आमदार भिडले

प्रतिनिधी मुंबई

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजकारणाची पायरी घसरल्याचा प्रत्यय आला. घोषणाबाजीवरून बुधवारी विधानभवनाच्या पायऱयांवरच सत्ताधारी व विरोधी आमदारामध्ये ‘फ्री स्टाईल’चे दर्शन घडले. खोके आणि ओक्केवरून दोन्ही बाजूंचे आमदार भिडल्याने जोरदार राडा होऊन अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. सत्ताधाऱयांमधील आमदार महेश शिंदे आणि विरोधी आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावरून आमदार हमरीतुमरीवर आले आणि प्रकरण शिवीगाळ, दमबाजीपर्यंत पोहोचले. काही आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शिवसेनेतील बंडाळी, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने भाजपसोबत राज्यात  स्थापन केलेले सरकार, दरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱयांवर जमून शिंदे गटाच्या आमदारांना व भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली होती.

दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी

शिंदे गटाचे आमदार भाजपकडून 50 कोटी रुपये घेऊन शिवसेनेतून फुटल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्याच आशयाच्या घोषणा विरोधक पहिल्या दिवसांपासून देत आहेत. पन्नास खोके, एकदम ओके, खाऊन 50 खोके, माजलेत बोके, गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी अशा रोज नवनव्या घोषणांची भर पडत आहे. त्यामुळं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अस्वस्थ झाले होते. सभागृहात त्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, विरोधक थांबायला तयार नव्हते.

बुधवारी शिंदे गटाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱयांवर निदर्शने करत महाविकास आघाडीला लक्ष्य केले. कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, लवासाचे खोके, बारामती ओके, वाझेचे खोके, मातोश्री ओके अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी दिल्या. घोषणा सुरू असतानाच विरोधी पक्षाचे आमदार त्याठिकाणी आले. तसा शिंदे गटाच्या आमदारांना जोर चढला. विरोधकांनीही त्यांना प्रत्युत्तर दिल्यामुळे गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आमनेसामने आले. त्यामुळं तणाव निर्माण झाला. सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले व त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच रोहित पवार यांच्यासह अन्य काही आमदारांनी मध्यस्थी केली. त्यामुळं अनर्थ टळला. या प्रकारावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मिटकरी यांनी या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे. तर, विरोधकांप्रमाणे आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असं शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं आहे.

त्यांना आमच्या घोषणा झोंबल्या ः अजित पवार

माध्यमांशी संवाद साधताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या घोषणा झोंबल्या. यामुळेच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱयांवर आले. त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झाले आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत. आतापर्यंत सत्ताधारी पक्षाने कधीच पायऱयांवर आंदोलन केले नाही. आम्ही सत्तेत असतानाही विरोधकांनी पायऱयांवर येऊन घोषणाबाजी केली. आम्ही त्यांना कधीच अडवले नाही. चोराच्या मनात चांदणे, असा प्रकार आज हा घडला आहे.

शिंदे यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ ः अमोल मिटकरी

शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी म्हणाले की, मी एक शेतकऱयाचा मुलगा आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही सत्ताधाऱयांच्या विरोधात भूमिका मांडणार होतो. आम्ही आंदोलन करून घोषणाबाजी करीत होतो. तेव्हा शिंदे गटातील आमदारांनी मला आम्हाला शिवीगाळ करून धक्काबुकी देखील केली आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे.

मिटकरी यांनीच अर्वाच्य भाषा वापरली ः महेश शिंदे

आम्ही शांततेने विधानभवनाच्या पायऱयावर ते येण्याआधी पासूनच आंदोलन करत होतो. अनिल देशमुखांचे 100 खोके, बारामती एकदम ओके’ अशा घोषणा आम्ही देत होतो. या त्यांच्या जिव्हारी लागल्या. अमोल मिटकरी यांनीच अर्वाच्य भाषेत बोलायला सुरुवात केली, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. गेल्या चार दिवसांपासून आमच्याबाबत घोषणाबाजी करण्यात येत होत्या. आम्ही काही न बोलता बाजूने जात होतो. पण आज जेव्हा आम्ही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत बोललो तर त्यांना चांगलेच झोंबले.

अंगावर आले तर शिंगावर घेऊ ः भरत गोगावले

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आंदोलन केले. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ. आता आम्ही 165 ते 170 लोक आहोत. ते किती आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. 107 ते 99 अशी ती लोक होती. अशा वेळेला आम्ही 170 लोक आलो असतो तर काय झालं असतं. आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी यायची गरज नव्हती, याचा अर्थ त्यांना झोंबलं, मिरची चावल्यानंतर जशी झोंबते, तशी त्यांना ते झोंबली. कारण त्यांचा सगळा इतिहास आम्ही बाहेर काढला.

Related Stories

नव्या कृषी कायद्यांविरोधात जनक्षोभ

Patil_p

‘तोयबा’ दहशतवाद्यासह हाफिज हमजाचा खात्मा

Patil_p

देशात आणखी 18 हजार बाधित

datta jadhav

उत्तराखंड महाप्रलय : 26 मृतदेह हाती, अजूनही 171 जण बेपत्ता

datta jadhav

देशात कोरोना फैलाव थांबेना; गेल्या २४ तासांत २२,७७५ नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Khandekar

देशात 2.07 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav