स्वच्छता कामगारांच्या समस्या सोडविण्यास मनपा अपयशी ठरल्याने नाराजी
बेळगाव : स्वच्छता कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने बुधवारी आयोजित करण्यात आलेली बैठक शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र शुक्रवारीदेखील महापालिका आयुक्तांनी बैठक घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे शुक्रवारची बैठकदेखील लांबणीवर पडल्याने स्वच्छता कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छता कामगार निरीक्षण समिती आणि महापालिका आयुक्तांची बैठक बुधवारी आयोजित केली होती. मात्र बैठक सुरू असतानाच वादावादी झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी काढतापाय घेऊन शुक्रवारी बैठक घेवू, असे सांगितले होते. त्यामुळे स्वच्छता कामगार संघटनेचे पदाधिकारी शुक्रवारी सकाळी महापालिका कार्यालयात दाखल झाले. यावेळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेतली असता. आपण बैठकीला जाणार असल्याने आजची बैठक होवू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची घोर निराशा झाली.
स्वच्छता कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदने देण्यात येतात. याबाबत बैठक आयोजित करून चर्चा करू, असे आश्वासन देण्यात येते. पण बैठक घेण्यास टोलवाटोलवी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येकवेळी बैठक घेण्यास अनुत्सुकता दर्शविली आहे. शुक्रवारीदेखील बैठक घेण्यास असमर्थता दर्शविल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच स्वच्छता कामगारांच्या समस्यांकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला. अशाप्रकारे चालढकल करून स्वच्छता कामगारांवर अन्याय केला जात असून त्यांचे हक्क देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. विविध सुविधांपासून स्वच्छता कामगारांना वंचित रहावे लागत आहे. महापालिकेने स्वच्छता कामगारांना आवश्यक सुविधा आणि त्यांचे हक्क त्वरित द्यावे, अशी मागणी करण्यात आली.