Tarun Bharat

पृथ्वीवरून मंगळापर्यंत 45 दिवसांत पोहोचणार

नासाच्या तंत्रज्ञानाची कमाल ः सद्यकाळात लागतो 7 महिन्यांचा वेळ

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

जगभरातील अनेक देश दशकांपासून मंगळ ग्रहावर माणूस पाठविण्याची तयारी करत आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानुसार पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास 7 महिन्यांचा असतो. मंगळावर आतापर्यंत गेलेल सर्व रॉकेट्सना जवळपास इतकाच कालावधी लागला आहे, परंतु आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रवास केवळ 45 दिवसांचा राहणार आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचे नाव ‘न्युक्लियर थर्मल अँड न्युक्लियर इलेक्ट्रिक प्रॉपल्शन’ आहे. नासा मंगळासाठीच्या मानवी मोहिमेकरता आण्विक इंधनाचा वापर करता येईल अशाप्रकारच्या रॉकेटची निर्मिती करणार आहे. वैज्ञानिकांनी रॉकेटच्या पहिल्या टप्प्यालात विकसित करण्यास सुरुवात केली आहे. रॉकेट निर्मितीसाठी दोन तंत्रज्ञानांचा वापर होणार आहे. न्यूक्लियर थर्मल प्रॉपल्शनमध्ये न्युक्लियर रिऍक्टर असेल, जो लिक्विड हायड्रोजन प्रोपेलेंट तप्त करणार आहे. यातून प्लाझ्मा तयार होणार असून तो रॉकेटच्या नॉजलमधून बाहेर पडेल, यामुळे रॉकेटला पुढे जाण्यास मोठा वेग मिळणार आहे. 1955 मध्ये अमेरिकेचे वायुदल आणि अटॉमिक एनर्जी कमिशनने अशाप्रकारची प्रॉपल्शन सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

न्युक्लियर इलेक्ट्रिक प्रोपल्शन या दुसऱया तंत्रज्ञानात न्युक्लियर रिऍक्टर आयन इंजिनला इलेक्ट्रिसिटी पुरविणार आहे, यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे क्षेत्र जेनॉनसारख्या वायूंना वेग प्रदान करते, यामुळे रॉकेटला पुढे जाण्यासाठी वेग मिळतो.

नव्या तंत्रज्ञानाद्वारे वैज्ञानिक रॉकेटच्या कामगिरीला जवळपास दुप्पट करू शकतील. रॉकेट निर्मितीची ही संकल्पना फ्लोडिरा युनिव्हर्सिटीत हायपरसोनिक्स प्रोग्राम एरिया लीड प्रोफेसर रेयान गोसे यांनी मांडली आहे. याचा पहिला टप्पा विकसित करण्यासाठी त्यांच्यासोबत आणखी 13 जणांना संशोधनात सामील करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी 12.5 हजार डॉलर्सचा प्रारंभिक निधीही मंजूर करण्यात आला आहे.

सद्यकाळात वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानाद्वारे अंतराळयान पृथ्वीहून मंगळावर जाण्यासाठी 7-9 महिन्यांचा कालावधी लागतो. याच वेगाने मानवी मोहीम राबविली गेल्यास दर 26 महिन्यांमध्ये एक अंतराळयान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. तसेच एक मोहीम 3 वर्षांपर्यंतच चालू शकणार आहे. परंतु नव्या तंत्रज्ञानाद्वारे मंगळावर जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास केवळ 45 दिवसांचा ठरणार आहे. यामुळे मोहिमेचा खर्च कमी होणार आहे. तसेच अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणामुळे मानवी प्रकृतीशी निगडित धोक्यांची तीव्रताही कमी होणार आहे.

Related Stories

कोरोना उपचारात ‘आयवरमेक्टिन’ वापरणं धोक्याचं : WHO

datta jadhav

एकटाच पकडतो मगर

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींनी ओलांडला एक लाखाचा टप्पा

datta jadhav

सहारा वाळवंटापासून युरोपमध्ये पोहोचणारे फुलपाखरू

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या दबावामुळे अखेर गुगलने मानली हार

Patil_p

भारतात गुंतवणूक करणे ‘आसियान’ला शक्य

Patil_p