आयआयटी गुवाहाटीकडून एडिबल कोटिंगची निर्मिती
फळे आणि भाज्यांना फ्रेश ठेवण्यासाठी इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटीतील संशोधकांनी एडिबल कोटिंग म्हणजेच खाता येणारे आच्छादन तयार केले आहे. याच्या मदतीने खाद्यपदार्थ पूर्वीच्या तुलनेत अधिक काळ ताजे राहणार आहेत. या एडिबल कोटिंगला विशेषकरून अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे संशोधन एसीएस फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


संशोधकांनी एडिबल कोटिंगचे बटाटे, टॉमेटो, हिरवी मिरची, स्ट्रॉबेरीज, सफरचंद, अननस आणि कीवीसारख्या भाज्या-फळांवर परीक्षण केले आहे. कोटिंगमुळे खाद्यपदार्थ दोन महिन्यांपर्यंत ताजे राहू शकतात अशी माहिती आयआयटी गुवाहाटीच्या डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक विमल कटियार यांनी दिली आहे. कोटिंग लावल्यावर टॉमेटोचे शेल्फ लाइफ एक महिन्याने वाढणार आहे. याचबरोबर स्ट्रॉबेरीजचे शेल्फ लाइफ केवळ 5 दिवसांचे असते, परंतु एडिबल कोटिंगच्या मदतीने स्ट्रॉबेरीज 20 दिवसांनीही खाता येणार आहेत.
एडिबल कोटिंगमध्ये मायक्रो एल्गीचा एक्सट्रक्ट आणि पॉलीसेकेराइड यांचा समावेश आहे. एक्सट्रक्ट सागरी मायक्रोएल्गी डुनालीएला टेरिओलेक्टापासून मिळविण्यात आला आहे. एल्गीचे तेल काढण्यात आल्यावर उर्वरित पदार्थ फेकण्यात येत होता. कटियार आणि त्यांच्या टीमने याच उर्वरित पदार्थाचा वापर करत एडिबल कोटिंग तयार केले आहे. यात काइटोसन मिसळण्यात आले असून ते एकप्रकारच्या साखरेसारखे असते. याला शेलफिशद्वारे प्राप्त केले जाते.
लवकरच बाजारात उपलब्ध
कटियार हे स्वतःच्या टीमसोबत मिळून मागील 6 वर्षांपासून भाज्या आणि फळांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी कोटिंग तयार करत आहेत. आता त्यांना यात यश प्राप्त झाले आहे. त्यांनुसार कोटिंगची सामग्री पूर्णपणे नॉन-टॉक्सिक आणि खाण्यासाठी सुरक्षित आहे. एडिबल कोटिंग उद्योगांच्या मदतीने बाजारात आणण्यासाठी आम्ही तयार आहोत. या प्रकल्पात आमची मदत करावी असे आवाहन आम्ही उद्योगक्षेत्राला करत आहोत असे कटियार यांनी म्हटले आहे.