24 वर्षाचा विक्रम मोडल्याची नोंद : स्वस्त रशियन तेलाचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वस्त रशियन तेलामुळे देशातील औद्योगिक क्षेत्रांच्या कामगिरीला मोठी चालना मिळाली आहे. फेब्रुवारीमध्ये इंधनाचा वापर 5 टक्के पेक्षा अधिकने वधारुन 4.82 दशलक्ष बॅरल प्रतिदिन (18.5 दशलक्ष टन) इतका झाला आहे. भारतीय तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अॅण्ड अॅनालिसिस सेलने (पीपीएसी)नोंदवलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. पीपीएसी 1998 मध्ये सुरू करण्यात आले.
वर्षभराच्या आधारावर पेट्रोलच्या विक्रीत 8.9टक्के वाढ झाली आहे
फेब्रुवारीमध्ये पेट्रोलची विक्री वार्षिक 8.9टक्क्यांनी वाढून 2.8 दशलक्ष टन झाली, तर डिझेलचा वापर 7.5 टक्क्यांनी वधारुन तो 6.98 दशलक्ष टन झाला. आकडेवारीनुसार, जेट इंधनाची विक्री 43 टक्केपेक्षा जास्तीने वाढून 0.62 दशलक्ष टन झाली आहे. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) विक्री 0.1टक्क्यांनी घटून 23.9 लाख टन झाली.
रस्ते बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिटुमनची विक्री जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये 21.5 टक्क्यांनी वाढली, तर इंधन तेलाचा वापर फेब्रुवारीमध्ये 5टक्केपेक्षा थोडा कमी झाला. केपलरचे प्रमुख क्रूड विश्लेषक व्हिक्टर काटोना म्हणाले की, मार्चमध्ये मागणी 5.17 दशलक्ष बॅरल प्रतिदिन असेल आणि मोसमी पावसामुळे चालणाऱ्या मंदीमुळे एप्रिल-मेमध्ये 5 दशलक्ष बॅरल प्रतिदिनपर्यंत घसरेल.
भारतीय कंपन्या रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहेत.
एनर्जी कार्गो ट्रॅकर व्होर्टेक्साच्या मते, भारताने डिसेंबरमध्ये रशियाकडून दररोज सरासरी 1.19 दशलक्ष बॅरल कच्चे तेल खरेदी केले. एक वर्षापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये भारत रशियाकडून दररोज 36,255 बॅरल तेल खरेदी करत असे. म्हणजेच रशियाकडून तेल खरेदी एका वर्षात 32 पटीने वाढली.
भारत आता 25 टक्के तेल रशियाकडून खरेदी करतो. मार्च 2022 पर्यंत भारत रशियाकडून आपल्या गरजेपैकी फारच कमी हिस्सा विकत घेत असे, परंतु एप्रिलपासून परिस्थिती बदलू लागली. ऑक्टोबरमध्ये रशियाने भारताला तेल विकण्यात इराक आणि सौदी अरेबियाला मागे टाकले.