प्रतिनिधी /बेळगाव
काही राज्यांमध्ये इंधन संकट जाणवत असल्याने पेट्रोलपंपांवर टंचाई जाणवत आहे. याची झळ आता बेळगावमध्येही जाणवू लागली आहे. शहरातील काही पेट्रोलपंपांवर शुक्रवारी पेट्रोल व डिझेलची कमतरता असल्याचे दिसून आले. यामुळे इंधन भरण्यासाठी इतर पेट्रोलपंपांवर वाहनचालकांची गर्दी झाली होती.
मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक राज्यांमधील काही पेट्रोलपंपांवर इंधनटंचाई भासत आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात डिझेल नसल्याने इंधन टंचाईचा सामना वाहनचालकांना करावा लागला. त्यामुळे सीमावर्ती भागातील पेट्रोलपंपांवर इंधन भरत होते. आता बेळगावातही काही पेट्रोलपंपांवर ही परिस्थिती जाणवत आहे. इंधन कुठे मिळेल का? हे शोधण्यात वाहनचालकांचा वेळ जात आहे. परंतु उर्वरित पेट्रोलपंपांवर इंधनसाठा मुबलक असल्याचे पेट्रोलपंप चालकांनी ‘तरुण भारत’श़ी बोलताना सांगितले.