बेळगाव रेल्वे पोलिसांची कारवाई : जामीन मिळताच झाला होता फरार
प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेत प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला एक आरोपी जामीन मिळाल्यानंतर पुन्हा न्यायालयासमोर हजर झाला नव्हता. या फरारी आरोपीला बेळगाव रेल्वे पोलिसांनी 13 वर्षांनंतर अटक केली आहे.
नागराज बाबू पवार (वय 23, रा. जनता प्लॉट, अंचटगेरी, ता. हुबळी, जि. धारवाड) असे त्याचे नाव आहे. रेल्वे विभागाच्या पोलीसप्रमुख शिरीगौरी, पोलीस उपअधीक्षक व्यंकनगौडा पाटील, पोलीस निरीक्षक महांतेश हुली आदी वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवानंद अरेनाड व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
उपलब्ध माहितीनुसार 17 जून 2009 रोजी रात्री यशवंतपूर-वास्को एक्स्प्रेस रेल्वेतील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील किमती वस्तू पळविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी लोंढा येथील तत्कालीन स्टेशनमास्तर उमेशकुमार भास्करराव यांनी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. रेल्वे पोलिसांनी अशोक चव्हाण, महम्मदअली बिल्ला कुंदगोळ, मंज्या उर्फ सायंटिस्ट मंज्या भंडारी, नासीर सत्तारसाब खाजी, संतोष बसय्या पुजारी, नागराज बाबू पवार, सागर सुभाष हेब्बळ्ळी, मंजुनाथ उर्फ कळ्ळमंज्या बाबू पवार, भीम्या उर्फ भीमाप्पा हणमंत हरिजन या 9 जणांना अटक करून त्यांच्यावर येथील नववे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. नागराज पवार वगळता इतर 8 जणांची या खटल्यातून निर्दोष मुक्तताही झाली आहे. जामीनवर सुटकेनंतर नागराज पुन्हा न्यायालयासमोर हजर झाला नाही. यामुळे त्याच्यावर न्यायालयाचा वॉरंट निघाला होता. रेल्वे विभागाच्या वेगवेगळय़ा खटल्यात फरारी झालेल्या 15 जणांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू होते. बुधवारी नागराजला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.