Tarun Bharat

तुरुंगांचा संपूर्ण ताबा यापुढे पोलिसांकडे

Advertisements

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : तुरुंग व्यवस्थेत अनेक बदल विचाराधीन,कोलवाळ तुरुंग व्यवस्थेची केली पाहणी

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील तुरुंग व्यवस्थेत लवकरच अनेक मोठे बदल करण्यात येणार असून यापुढे तुरुंगांचा ताबा पोलीस अधीक्षकांकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे तुरुंगातील अनेक गैरव्यवहारांना आळा बसेल. एवढेच नव्हे तर नव्या सुधारणांमुळे कैद्यांवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल. त्याचबरोबर त्यांचे आरोग्य सांभाळले जाईल आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांनाही चालना देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी कोलवाळ येथील तुरुंगाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी पणजीत आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. आतापर्यंत तुरुंगांचा ताबा तुरुंग महानिरीक्षकांकडे असायचा. यापुढे तो पोलीस अधीक्षक आणि त्याखालील अधिकाऱयांकडे देण्यात येईल. त्यामुळे तेथील बेकायदेशीरपणा, अनियंत्रितपणा, कैद्यांशी संबंधित असंख्य प्रश्न सुव्यवस्थितरित्या हाताळण्यात येतील. सध्या केवळ सुरक्षा किंवा कैद्यांची ने-आण करण्यासाठी तेथे आयआरबी पोलीस आणि सुरक्षारक्षक असायचे. यापुढे संपूर्ण तुरुंगाची व्यवस्था पोलीस अधीक्षक हाताळणार आहेत. त्याद्वारे तुरुंग व्यवस्थेत अनेक बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तुरुंगात डेअरी स्थापण्याचा विचार

कैद्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते तेथील प्रशिक्षण केंद्र, डॉक्टर्स, वैद्यकीय/योग थेरपी, समुपदेशन, मानसोपचार, यासारख्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्याचबरोबर तुरुंगात डेअरी सारखे प्रकल्पही स्थापन करण्याचा विचार आहे. एका बाजूने कैद्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवतानाच दुसऱया बाजूने त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे तसेच त्यांना विविध कलांचे प्रशिक्षण देणे आदी कामे करण्यात येतील.

बहुतांश गुन्हय़ांमध्ये बिगरगोमंतकीयच

राज्यात गत काही दिवसांपासून अनेक अप्रिय घटना घडत आहेत. त्यातून राज्याचे नाव बदनाम होत असल्याचे निदर्शनास आणले असता, यातील जवळजवळ प्रत्येक घटनेत बिगरगोमंतकीयांचाच सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर 99 टक्के प्रकरणात आरोपींना 24 ते 72 तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांकडे कारभार दिल्याने होणार सुधारणा

यापूर्वी अनेकदा तुरुंगात कैदी किंवा कर्मचाऱयांकडे अमलीपदार्थ सापडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे विचारले असता, तेथे नियुक्त जेलगार्ड वा सुरक्षरक्षक यांनाही पुढील प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठीच त्यांना पोलिसांच्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे. यापुढे तुरुंगांचा ताबा अधीक्षकांकडे आल्यानंतर सर्व स्थिती नियंत्रणात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अचानक भेटीने अधिकाऱयांची धावपळ

मुख्यमंत्र्यांनी कोलवाळ सेंट्रल जेलमध्ये अचानक भेट देऊन येथील पाहणी केली. जेलबाबत सर्व माहिती जाणून घेतली. जेलमध्ये फिरून तपासणीही केली. कोलवाळ जेल या ना त्या कारणावरून बरेच चर्चेत आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीने येथील अधिकारीवर्गाची एकच धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी काही कैद्यांबरोबर चर्चा करून माहिती जाणून घेतली. नंतर तुरुंग अधिकारी तसेच जेलर आदीशी चर्चा केली. पोलीस संरक्षण आदी बाबतही माहिती जाणून घेतली. प्रशासकीय बदल करण्याबाबतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

गिरीश नामक त्या व्यक्तीने पुरावे सादर करावे

आपल्या मंत्रीमंडळातील प्रत्येक सदस्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आमच्या कोणत्याही मंत्र्याचा जमीन वा अन्य कोणत्याही घोटाळ्यात हात नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. गिरीश चोडणकर नामक कोण एक व्यक्ती ज्या घोटाळ्याचे आरोप करत आहे, त्यासंबंधी कोणतेही पुरावे असतील तर त्यांनी ते एसआयटीकडे द्यावे. आपण एसआयटीला चौकशी करण्यास सांगेन. पारदर्शक चौकशी करण्याची आमची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

शिक्षिकेला जाळून मारण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

राखीवता रद्द होण्यास सरकार जबाबदार

Amit Kulkarni

बसवेश्वर मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी

Amit Kulkarni

तुळशी विवाहाच्या खरेदीसाठी चावडी बाजारात लोकांची गर्दी

Amit Kulkarni

कळसा भंडुरा प्रकरणी लक्ष घालून त्वरित कृती करा

Amit Kulkarni

बाणसाय शूटआउट वर पोलिसांची कारवाई बनली चर्चेचा विषय

Amit Kulkarni
error: Content is protected !!