मनपा मुख्य कार्यालयातील निवडणूक विभागाचे स्थलांतर
बेळगाव ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाचा निवडणूक विभाग महापालिका कार्यालय आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आला आहे. याठिकाणी आवश्यक तयारी करण्यात आली असून दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे कक्ष आणि सर्व निवडणुकीचे कामकाज मनपाच्या प्रशासकीय इमारतीत चालणार आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी चालविली होती. दक्षिण आणि उत्तर मतदार क्षेत्रातील निवडणूक अधिकारी कार्यालय महापालिकेच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी उमेदवारी अर्ज भरणा तसेच सभा, बैठक आणि दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीचे कामकाज चालणार आहे. निवडणुकीदरम्यान प्रचाराकरिता सभा, बैठक व जाहिरातबाजी करण्यासाठी निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक असल्याने मनपा कार्यालयात परवानगी देण्याची व्यवस्था केली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांचे कामकाज चालणार असून मतदारयादीत नावनोंदणी किंवा निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक कामासाठी या कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे.