Tarun Bharat

देशात 56 ठिकाणी ‘जी-20’च्या बैठका

Advertisements

अंदमान-निकोबारपासून लक्षद्वीपर्यंत होणार आयोजन : विमानतळांवर विशेष व्यवस्था

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताला पहिल्यांदाच ‘जी-20’चे अध्यक्षत्व पार पाडण्याची संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला एक मोठी कामगिरी मानले जात आहे. डिसेंबर 2022 पासून भारताला ही जबाबदारी प्राप्त होणार आहे. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारत जी-20 समुहाचा अध्यक्ष असणार आहे. या कालावधीच्या दरम्यान वर्षभरात 200 हून अधिक बैठकांचे आयोजन होणार असून यात सदस्य देशांचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. या बैठका देशात 56 ठिकाणी पार पडणार आहेत. सर्वसाधारणपणे कुठल्याही मोठय़ा सोहळय़ाचे आयोजन टायर-1 शहरात केले जाते, परंतु यंदा सरकारने विशेष नियोजन केले आहे.

जी-20 अंतर्गत होणाऱया बैठका आता टायर-2चा दर्जा प्राप्त असलेल्या शहरांमध्येही पार पडणार असून याकरता पूर्ण तयारी केली जात आहे. जी-20 अंतर्गत होणाऱया बैठका अंदमान-निकोबारपासून लक्षद्वीप तसेच ईशान्येतील राज्यांमध्येही आयोजित होतील. सुमारे 25 मंत्रीस्तरीय, 4 शेरपास्तरीय, कार्यकारी गटाच्या 86 तर सुमारे 56 अन्य सोहळे तसेच 46 एंगेजमेंट ग्रूपच्या बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी नियोजन करण्यात आले आहे.

वर्षभरात आयोजित होणाऱया या बैठकांमध्ये सामील होण्यासाठी ‘जी20’चे सदस्य देश आणि अतिथी देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांसह 43 आंतरराष्ट्रीय संघटनाचे प्रतिनिधीही भारतात येणार आहेत. ‘जी20’च्या बैठकांसाठी सरकार सक्षम इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा शोध घेतेय. मंत्रिस्तरीय बैठकांमध्ये सामील होण्यासाठी 250 ते 300 प्रतिनिधी देशात पोहोचतील. याचबरोबर 200-250 च्या सुमारास प्रतिनिधी शेरपा बैठकांसाठी भारतात दाखल होणार आहेत. याचबरोबर अन्य छोटय़ा गटांशी निगडित प्रतिनिधीही पोहोचतील.

देशाच्या कानाकोपऱयात होणार बैठका

मंत्रिस्तरीय आणि एंगेजमेंट ग्रूपशी निगडित बैठकांसाठी येणारे प्रतिनिधी एक ते दोन दिवस भारतात थांबतील. याचबरोबर कार्यकारी गटासाठी येणारी शिष्टमंडळं 2-3 दिवसांपर्यंत भारतात राहणार आहेत. त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात येत आहे. ईशान्येतील सर्व राज्यांसोबत लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारमध्येही बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. एका आठवडय़ात एकाचवेळी 5 समारंभांचे आयोजन केले जाऊ शकते. या बैठका देशाच्या विविध भागांमध्ये होतील.

विदेशी अतिथींसाठी विशेष व्यवस्था

जी-20 शी निगडित बैठकांमध्ये सामील होण्यासाठी भारतात येणाऱया विदेशी अतिथींसाठी विशेष व्यवस्था करण्याची योजना सरकारने आखली आहे. देशातील सर्व विमानतळांवर ‘जी20’ थीमवर आधारित व्हीव्हीआयपी लाउंज तयार केले जातील. याचबरोबर अतिथींसाठी विशेषकरून कस्टम आणि इमिग्रेशन काउंटरची व्यवस्था करण्यात येईल.

जी20चे अध्यक्षत्व मोठी संधी

‘जी20’ गटाच्या अध्यक्षाची जबाबदारी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘जी20’ एक बहुदेशीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असून तेथे सामाजिक-आर्थिक तसेच जागतिक तापमानवाढ, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, कृषी, डिजिटल अर्थव्यवस्था, शिक्षण, पर्यटन, ऊर्जा, रोजगार इत्यादी क्षेत्रांकरता धोरणे ठरविण्यात येतात.

Related Stories

मालदीवमध्ये भीषण आग ; ९ भारतीयांचा मृत्यू

Archana Banage

मुख्यमंत्री खट्टर यांच्या नेतृत्वाखाली २०२४ ची निवडणूक लढवा; केजरीवालांचे भाजपला आव्हान

Archana Banage

शेवटी हीच जनता सरकार संपवते : राहुल गांधी

Archana Banage

रामलल्लाच्या दर्शनाला प्रतिदिन लाख भाविक येणार

Omkar B

इम्रान खान यांना भारत दौऱयाचे निमंत्रण शक्य

Patil_p

चमोली दुर्घटना : 16 व्या दिवशीही बोगद्यातून राडारोडा काढण्याचे काम सुरू

datta jadhav
error: Content is protected !!