व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी / पुणे
जी. ए. कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व हे एकांतप्रिय होते. त्यांना समक्ष भेटी वर्ज्य असल्या, तरी त्यांना संवाद वर्ज्य नव्हता. काही व्यक्तिमत्त्वांना सर्वसामान्यांच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न न करता त्या व्यक्तिमत्त्वांपुढे नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करून काही कोपरे हे तसेच सोडायचे असतात. जी. ए. कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व हे तसेच काहीसे होते, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी येथे व्यक्त केले. पत्र लेखनातून उलगडणारे जीएंचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आगळेवेगळे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
जी. ए. कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने जी.ए. कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त अक्षरधारा बुक गॅलरी येथे मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि सुभाष अवचट लिखीत ‘जी. ए. एक पोटेट’ या पुस्तकाचे प्रकाशन शि. द. फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मिलिंद जोशी, जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश आणि रसिका राठिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शि. द. फडणीस म्हणाले, काही व्यक्तीमत्वांना बदलण्याचा अट्टाहास करू नये. जी. ए. कुलकर्णींना संवाद वर्ज्य होता, हे काही अंशी खरे असले, तरी त्यात त्यांना प्रत्यक्ष संवाद वर्ज्य होता, असे दिसते. पत्ररूपाने सुनीताबाईंशी आणि इतर मान्यवरांशी केलेल्या संवादातून असे दिसून येते, की त्यांना अप्रत्यक्ष संवाद प्रिय होता. अवचट आणि जी. ए. यांच्यामध्ये चित्रकला, चित्रकलेची शैली यासंदर्भात अनेकदा संवाद व्हायचे. कोणालाही सहज उपलब्ध न होणारे जी. ए. अवचटांना सहज उपलब्ध व्हायचे आणि चित्रकलेविषयी त्यांच्या गप्पांच्या मैफली व्हायच्या. जीएंचे साहित्य माझ्या वाचनात तसे खूप उशिरा आले. परंतु, ज्यावेळी मी जी. ए. वाचायला सुरूवात केली, त्यावेळी मी त्यांच्या लेखनशैलीने अवाक झालो, भारावून गेलो. जीएंनी दीर्घ कथा लिहिल्या. पत्र लेखनातून उलगडणारे जीएंचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते. तर दीर्घ कथांमधून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले.