अनिल बेनके चषक अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्टस् फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून जी. जी. बॉईजने आर्मी व इंडियन बॉईजचा, एवायएमने एस. एस. फौंडेशन व मराठा स्पोर्टस् संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. संदीप मक्वाना, जय बनकर यांना प्रत्येकी दोन सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जी. जी. बॉईजने 8 षटकात 6 बाद 84 धावा केल्या. संदीप मक्वानाने 22 तर साहिल मोमीनने 10 धावा केल्या. आर्मीतर्फे मुनीरने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्मी इलेव्हन संघाने 8 षटकात 6 बाद 53 धावा केल्या. एस. के. आर्मेने 27 धावा केल्या. जी. जी. बॉईजतर्फे सुशीलने 2 तर खाजाने एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एस. एस. फौंडेशनने 10 षटकात 6 बाद 92 धावा केल्या. अभी पाटीलने 32 तर पुंडलिकने 19 धावा केल्या. एवायएमतर्फे अनिलने 2 तर संतोषने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम संघाने 7.1 षटकात 2 बाद 93 धावा करत सामना 8 गड्यांनी जिंकला. जे. बनकरने 36, धीरज कोलीने 26 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात इंडियन बॉईजने 10 षटकात 7 बाद 75 धावा केल्या. राहुल नाईकने 22 तर माजीद मकानदारने 19 धावा केल्या. जी. जी. बॉईजतर्फे खाजा व जावेद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जी. जी. बॉईजने 5.1 षटकात 2 बाद 79 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. संदीप मक्वानाने 51, नरेंद्र व रमेश यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे माजीद मकानदारने 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात एवायएम संघाने 10 षटकात सर्व बाद 110 धावा केल्या. जय बनकरने 39 तर मनोज मानेने 26 धावा केल्या. मराठा स्पोर्टस्तर्फे रोहित देसाईने 5 तर मनोजने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्टस् संघाचा डाव 9.4 षटकात 89 धावात आटोपला. प्रसाद नाकाडीने 35 तर रोहित व मनोज यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. एवायएमतर्फे लखन व अनिल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
गुरुवारचे सामने : 1) प्रथमेश मोरे वि. फॅन्को स्पोर्टस् सकाळी 9 वाजता. 2) एस. जी. स्पोर्टस् वि. एवायएम बी सकाळी 11 वाजता, 3) पी. एम. बॉईज वि. सीसीबी इलेव्हन दुपारी 1.30 वाजता, 4) पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता यांच्यात 3 वाजता.