वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल टेबलटेनिसपटू जी.साथीयानने क्रोएशियातील झाग्रेब येथे सुरू असलेल्या विश्व टेबलटेनिस कंटेन्डर स्पर्धेत शेवटच्या सोळा फेरीत प्रवेश मिळविताना जागतिक सहाव्या मानांकित व विद्यमान युरोपियन चॅम्पियन जॉर्गिक डार्कोला 3-1 असा पराभवाचा धक्का दिला.
साथियानने धाडसी खेळ करून आपले डावपेच यशस्वीरीत्या राबवित स्लोव्हेनियाच्या डार्कोवर 6-11, 12-10, 11-9, 12-10 अशी मात केली. डार्कोला येथे दुसरे मानांकन मिळाले होते. टॉप टेनमधील खेळाडूला हरविण्याची साथियानची ही दुसरी वेळ आहे. याआधी साथियानने जपानचा माजी जागतिक पाचव्या मानांकित टोमाकाझू हारिमोटोला 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये हरविले होते. बर्मिंगहममध्ये होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय टेटे संघाचा साथियान हा एक सदस्य आहे. 28 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.